ती सकाळी लवकरच उठली होती एकदम, विशालला डब्बा द्यायचा होता ना शाळेला. विशुची आवडती भाजी, काकडी, टोमाटो, पोळी डब्ब्यामध्ये भरून विशुच आवरून ती खाली त्याला सोडायला आली. विशुची बस अजून यायला ५ मिनिट होते. विशू एका काडीने मातीमध्ये रेघोट्या ओढत होता.
तेवढ्यात ते दोघे आले. जया आणि मना.
विशूने लग्गेच त्याच्या ताई ला हाय केला. तिने पण त्याच्या गालाची पापी घेतली.
ती खाली थांबली होती. बहुदा त्यांची गाडी येणार होती. पण तेवढ्यात जया परत वरती घरी गेला आणि मिनिटा-दोन-मिनिटा मधेच हातामध्ये फुलांचा गुचछ घेवून आला. एका रिक्षा ला बोलावून दोघे त्यामध्ये बसून गेले. तेवढ्यात विशुची बस आली आणि तोही शाळेत गेला.
ती वर आली, येताना चार फुले घेवून आली. पूजा करून, विशुचा पसारा आवरून ती बसली.
लिहायला बसली -
"ओढ कुणाची तेच कळत नाही,
खंत कशाची होते समजत नाही,
उगाच काही होत नाही - हे उमगते,
पण कारण मात्र कशाचे काहीच कळत नाही..."
तेवढ्यात बेल वाजली. आता कोण असेल म्हणून ती उठली तर शेजारच्या कांबळे काकू होत्या. त्यांना त्यांच्या घराची चावी देवून ती पुन्हा लिहायला बसली.
"जमेची बाजू एवढीच कि खुश राहायला शिकले,
पर्वत चढायला नाही तरी पण रस्त्यावर चालायला शिकले,
कोण कुणाचे शोधात नाही बसले,
दुख जर्जर झाले तरी, उगाच रडत नाही बसले.
पण तू नसता तर,
हसणे इतके सोप्पे असते हे कदाचित कधीच नसते वाटले ..."
खाली भाजीवाल्याचा आवाज ऐकून ती एकदम भानावर आली. भाजीची पिशवी घेवून निघाली. भाजीवाल्याच्या भोवती खूप बायका गराडा घालून होत्या. आणि तिथे ती पण होती - मना !
तेव्हा तिने मनाला जवळून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज होत. मना भाजी घेवून निघून गेली. ती सुद्धा भाजी घेवून वरती आली.
तिने हळूच खिडकीमधून डोकावून मनाच्या घरातली हालचाल टिपायचा प्रयत्न केला. पण मना बाल्कनी मध्ये उभी होती. तिची ओढणी अशी उडत होती.
————
तिची ओढणी अशीच वाऱ्यावर भुरभुरत होती. ती गाडी चालवत होती आणि तो मागे बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर तिचे केस उडत होते. आणि हा क्षण त्याला जगातला सर्वात सुखाच क्षण वाटे. तो आपला शांतपणे मंद मंद स्वताशीच हसे. तिची बडबड सुरु असे आणि हा मात्र त्या उडणाऱ्या बटा चेहऱ्यावर घेत स्वर्गीय आनंद घेत असे. मग मधूनच तिने काही प्रश्न विचारला कि याच लक्ष नसे. मग ती जाम चिडे. आणि तिच्या रागात येण्याची हा अजून मजा लुटे. मग ती खूप चिडल्यावर तो तिच्यासाठी काहीतरी गुणगुणे -
ओढ कशी लागली तुझी मजला कळले नाही,
खंत आता फक्त हीच कि तू जवळ नाही,
उगाच काहूर का माजे सांजवेळी,
समोर असूनही कासावीस मन माझे - कारण मात्र समजले नाही...