नवीन शूज आणि नवीन लूझर घालून मी तयार होते जॉगिंग ला जायला. माझ्या साठी ते जॉगिंग कमी आणि फोटोग्राफी जास्त असाच होत. कानामध्ये मस्त हेडफोन घालून माझी समुद्राकाठची फेर चालू वयाची, त्यामध्ये मिसळायचा लाटांचा आवाज. मलाही माहिती होत कि, हे फक्त नव्याचे नऊ दिवस होणारे, कोणतीही गोष्ट परत परत करताना मला येणारा कंटाळा फार महागात पडायचा, पण चला जोपर्यंत शूज नवीन आहेत तोपर्यंत तरी चिंता नव्हती कंटाळ्याची ! यावेळी हे नव्याचे नऊ दिवस २ महिने टिकले होते. जवळ जवळ २ महिने न चुकता जॉगिंग केली.
तो दिवस सुद्धा असाच होता, नेहमीसारखाच. मीही नेहमीसारखीच निघाले कानामध्ये काड्या घालून. किनाऱ्यावरती फुटपाथ केला होता, त्याच्या कडेकडेने मी निघाले, थोडा वेळातच हेडफोन चा कंटाळा आला. खरतर तीच तीच गाणी रोज ऐकून कंटाळा आला होता किवा बहुतेक लाटांचा नाद त्या गाण्यापेक्षाही मधुर वाटत होता कानाला. शेवटी ते निसर्गाचे संगीत. पाऊन तासामध्ये एक फेरी मारून परत आले. संध्याकाळ झाली होतीच एव्हाना. आणि आकाशामध्ये सूर्य लाल रंग फेकून पळून जायच्या तयारीमध्ये होता. नंतर रात्र येवून त्याचा लाल रंग सावडून, काळा रंग पसरवणार होती, तिच्या लाडक्या चंद्रासाठी.
तेवढ्यात ते दोघे दिसले, त्यांची काठी त्या पुतळ्याला शोधात होती. त्याच्या एका हातात काठी होती आणि दुसऱ्या हातामध्ये तिचा सुरकुतलेला हात. तिच्या दुसऱ्या हातामध्ये एक पिशवी होती. त्या दोघांच्या चेहऱ्यावर सुद्धा सूर्य रंग फेकत होता, त्यामुळे दोघांचा आधीच गुलाबी असलेला चेहरा अजून तेजपुंज वाटत होता. मी आपली लांबूनच पाहत होते. ते तिथेच गोल गोल फिरत होते, पण तो पुतळा काही त्यांना सापडेना किवा त्याच्या हातामध्ये असलेल्या त्या यंत्रामधून सुद्धा पुतळ्याची दिशा सांगणारा आवाज येईना. कदाचित त्याची चार्जिंग संपली असेल. तेवढ्यात कोणीतरी तिथे आले आणि त्यांना विचारले कि काही मदत हवी आहे का म्हणून. त्यांनी पुतळ्याबद्दल विचारलं. पुतळा तर तिथेच होता, पण त्यांना समजल नाही कि तो तिथेच आहे म्हणून. काठीने चाचपत चाचपत ते पुतळ्याच्या चबुतऱ्या पर्यंत आले. तो तिथे उभा राहिला, तिने लगेच पिशवीतून तिची काठी काढली चाचपत चाचपत थोडीशी लांब गेली, पिशवीतून कॅमेरा काढला. अंदाजानेच चेहऱ्यासमोर पकडला, कि त्या कॅमेऱ्यातून कसलातरी अवाज आला. कि लगेच त्याच्या चेहऱ्यावर मोठ हसू झळकल आणि तिने कॅमेऱ्याच बटन दाबलं. फ्लाश पडला आणि फोटो निघाला.
मी मात्र अवाक होवून बघतच राहिले. त्यांना दृष्टी नाहीये हे समजायला मला २ मिनिटे लागली.
त्यांना दृष्टी जरी नसली तरी नजर दिली होती देवाने! जगण्याची, जगणं शिकवण्याची !
एव्हाना सूर्य रंग उधळून निघून गेला होता. पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर तोच सूर्य चमकत होता.
No comments:
Post a Comment