आता सर्वच बदललं आहे तिथलं, पण वाड्यासमोर आता सिमेंट चा रस्ता तयार केला आहे, अगदी वाड्यामध्ये सुद्धा नवीन विटांची भिंत आली आहे. आता सकाळी सकाळी वारा एकदम घरात घुसून चादरीतून उठवत नाही. आता वाऱ्याला चार भिंती ओलांडून तिथवर याव लागतं. वाड्याचे वैभव हे नवीनपणात नसून जुनेपणात जास्ती आहे हे आत्ता कळतंय. आता मामाही नाहीये आणि मामाचा वाडाही आता आधीसारखं नाहीये. नवेपणामध्ये तो वाडा आता पूर्ण झाकोळून गेला आहे. पण थोड्याश्याच का असेनात त्याच्या आठवणी चं आहेत. प्रत्येकाला आपल्या आजोळच्या आठवणी भरभरून मिळतात. लाड करणारी आजी असते. गोष्टी सांगणारे, फिरवणारे, भजनाला घेवून जाणारे आजोबा असतात.
पण या सर्वातूनही मला तो वाडा फार आठवतो.
सकाळी सहा ला मला अलगद जाग यायची ती तिथेच. सकाळचा थंड गार हिरवा वारा थेट चादारीमध्ये घुसून उठवायचा. पाणी भरणारे, सकाळ सकाळ शेतावर जाणारे, सकाळच्या सारवनाचा वास, वाड्यातच असणारा गोठा, वासराचे सकाळी सकाळी हंबरणे. या सर्वांमुळे सकाळीच जाग यायची. थंड काळ्या दगडावर राखेने तासान तास दात चोळत बसने. मग मामी येणार सडा घालणार. रांगोळी काढताना मी थोडीशी लुडबुड करणार. मी रंग भरणार म्हणून मागे लागणार. आणि आई मात्र माहेरी आल्याचा आनंद लुटत अजूनही साखरझोपेमधे असणार.
शेतात जायचं तसं खूप वेड होत मला, अजूनही आहे. पण खरच इतका शुद्ध निसर्ग मी दुसरीकडे पहिला नाही. खरी खुरी जमीन आणि खरं खुरं आकाश तिथेच पाहायला मिळणार.
तिथेच एका सुट्टीमध्ये मी गोष्टीच पुस्तक वाचलं होत. त्यामध्ये एका लिचकुर पक्षाची गोष्ट होती. तो पक्षी जादूचा होता, आणि तो सर्वांची इच्छा पूर्ण करत असे. गोष्टीमधल्या गरीब मुलीचा तो मित्र होता आणि तिला त्याच्याकडून कोणतीही इच्छा पूर्ण नसते करायची तर तिला त्या पक्षाची अखंड सोबत हवी असते - गप्पा मारायला. गोष्टीमध्ये त्या पक्षच वर्णन केल होत. झालं, मग आपल्याला काम काय आहे ना. रोज सकाळ दुपार संध्याकाळ त्या पक्षाचा शोध सुरु झाला. वाड्यासमोर एक मोठ अंगण होत, अंगणात हापसा होता. पण हापसा कधीतरीच चालू असायचा, बाकी वेळेला तर आम्ही त्याचा उपयोग लोखंड-पाणी खेळायला करायचो. अंगण संपले कि पुढे एक भली मोठी भिंत होती. उंचच उंच. ती दुसऱ्या वाड्याची मागची बाजू होती आणि तो गढीचा वाडा होता म्हणून ती भिंत खूपच उंच होती. त्या भिंतीमाढल्या दगडांच्या खोपच्यात भरपूर पक्षाची रहायची जागा होती. असंख्य चिमण्या, साळुंख्या तिथे ठाण मांडून असायच्या. एके दिवशी मला तिथे नवीन पक्षी दिसला. हिरव्या रंगाची झाक असलेला, थोडासा निळसर, करड्या रंगाचा, डोक्याचा भाग अगदी मुखवटे रंगवल्यासारखा फिकट केशरी आणि शेपटी लांब, तिरकी थोडीशी उभात चातसा पिसारा असल्यासारखी. दुसऱ्या दिवशी तिथे अजून एक तसाच पक्षी दिसला. नंतर हळू हळू कळाल कि हे पक्षी तर इथे खूप आहेत पण त्याचं घर त्या दगडांच्या खोपच्यात नसून पलीकडच्या पडीक वाडातल्या झाडावर आहे. मग रोज त्याचं निरीक्षण सुरु झालं. या पक्षामध्ये आणि गोष्टीमधल्या पक्षामध्ये भरपूर साम्य होत. साम्य काय होत, ते दोन्ही एकाच पक्षी होत. आणि मला माझा लिचकुर पक्षी सापडला. मी सर्वाना रोज सकाळी तो पक्षी दाखवायचे आणि मनामध्ये इच्छा पकडायला सांगायचे, आणि सर्व मला हसायचे. कि लिचकुर पक्षी हा फक्त गोष्टीमध्येच असतो. पण माझा ठाम विश्वास होता कि जरी या पक्षाने माझ्या इच्छा पूर्ण नाही केल्या तरी देखील हाच तो लिचकुर पक्षी आहे.
त्या लिचकुर पक्षाकडे त्यावेळी मी अगणित इच्छा मागितल्या असतील - अगदी वर्गामध्ये मोनीटर होणार का पासून ते मी पायलट होईल का, चौथी स्कॉलरशिप मध्ये नंबर येणार का पासून ते उद्या गुलाबजामून खायला मिळणार का पर्यंत, मोठेपणी देशासाठी मरायची संधी मिळेल का पासून ते लसावी आणि मसावी काढण्यात पक्की होणार का पर्यंत अगदी खूप काही विचारलं असेल.
परवाच टीव्ही वरती एक कार्यक्रम लागला होता - शिंपी पक्षाबद्दल माहिती देत होते. तो कार्यक्रम खरतर जगामधल्या सुंदर बांधकामावर होता. आणि त्यामध्ये शिंपी पक्षाचे घरटे पण होते. शिंपी पक्षी त्याचे घरट वीणन्या साठी प्रसिद्ध आहे. निसर्गतः या पक्षामध्ये हि कला कशी अवगत आहे हा खरच एक संशोधनाचा विषय आहे. कार्यक्रमाच्या शेवटी त्या पक्षाच्या नावांची यादी दिली होती.
टेलर बर्ड (Tailor Bird ), वैद्यानिक भाषेत Orthotomus sutorius, गाणारा पक्षी (Singing Bird ), शिंपी, विणकर आणि "लिचकुर".
No comments:
Post a Comment