Friday, August 26, 2011

Revenge Day 2 - Happy Friendship Days !!!


रेस है सांसो कि म्हणत तिचा डान्स सुरु झाला. त्या डोंगरावरची लेणी संपली कि तिथून पुढे दाट झुडपं सुरु होत होती. त्या झुडूपा मधून रस्ता काढत ते तिथवर पोचले होते. जिथे छोटीशी मोकळी जागा होती, जिथून एक झरा निघून पुढे  लांबवर जावून लहानशा धबधब्याला मिळत होता, दाट झाडीमध्ये ती केवळ कदाचित एकच बसण्याजोगी मोकळी जागा होती. दहा बारा दगडांच्या मधून त्या झऱ्याच झुळझुळ पाणी वाहत होत आणि सोबत त्या १०-१२ जनाचा कल्ला. त्या झाडा झुडुपांमध्ये त्यांचा आवाज मिसळून जात होता. इतका कि जर तिथे कोणी डाकू-लुटेरे, किवा जंगलातले बरेच वाघ-चित्ते-सिंह आज काल शहरामध्ये येत असतात आणि जर का  त्यातलाच एखादा तिथे येवून त्याच्यावर हल्ला केला असता तरी कोणाला कळलेसुद्धा नसते. कोणी शोधायला तरी जाणार कुठे. नेहमी कॉलेजमधून पळ काढून अशा जागेवर जावून कल्ला करणाऱ्या तिच्या मैत्रिणी आणि ती, मग त्यांना तिथे त्या डोंगरामध्ये काही झाल असतं तरी शोधायला जाण्यासाठी कोणी जाणार तरी कुठे ना. पण अशा जागी जावून ठेले मांडताना कधीच म्हणजे कधीच त्यांनी असे वाईट विचार मनात सुद्धा आणले नाहीत. म्हणूनच तर तिथे जावून रेस है सांसो कि वर तिचे पाय बिनधास्त पाने ताल धरत होते.
१० मुली आणि २ मुल, असा त्यांचा ताफा त्या जंगल म्हणावं अशा ठिकाणी मजा करण्यात खूप मग्न होता. पहिल्यांदा धबधब्यामध्ये मनसोक्त भिजणे, मग धबधब्याच्या वरती चढून रस्ता काढत काढत त्या लेण्यापार्यंत पोचणे. सपाटून भूक लागलेली असल्यामुळे सर्वांनी डब्बे काढून ४ दिवसांच्या भूकेल्यान्सारखे ताव मारणे, आणि मग सुस्तावून गेले तरी पुढची वाटचाल सुरु करणे, भरपूर फोटो आणि फालतू विनोद्गिरी करत करत त्या लेण्यान्च्यापलीकडे जावून झाडा झुदुपामध्ये घुसून तिथे अंताक्षरी, डान्स, कल्ला करणे. मग घरी जायला उशीर होईल म्हणून लगबग करून तो डोंगर उतरणे, तिथेच पडलेल्या दारूच्या बाटल्या उचलून त्यासोबत फोटो काढणे, यामध्ये जे सुख आहे ते सुख स्वर्गामध्ये सुद्धा मिळणार नाही.
त्या लेण्यामध्ये तिच्या काही भाविक मैत्रिणीनी रुपयाची नाणी फेकून आपल्या इच्छा मागितल्या होत्या, कोणास ठावून त्यांना त्या इच्छा आज आठवत असतील कि नाही आणि आठवत असतील तर त्या पूर्ण झाल्या असतील कि नाही. पण जर काही पूर्ण झाले असेल तर ते आहे - मैत्री जगण्याचे स्वप्न. अशी मैत्री जी काळाच्या पुढे जावून एकमेकांना समजावून घेईल. अशी मैत्री जी मनाच्या पलीकडे जावून येईल. अशी मैत्री जी शक्याशक्य  गोष्टी मध्ये कधीच अडकणार नाही. अशी मैत्री जी फक्त आणि फक्त मैत्रीच आहे. 



 

No comments:

Post a Comment