Thursday, August 23, 2012

असेच काहीबाही, मनातले गोंधळ.


डोळे भिजून गेले होते ... पाण्याने उशी सुद्धा ओली ओली झाली होती. ती उठली आणि लिहायला बसली.. तेही काही सुचेना ...
खूप काही आठवत राहिले तिला, एकदम भार्काताल्यासारखे ती आठवणींमध्ये हरवून गेली - चांगल्या वाईट सर्वच.... 

रडताना तिला संदीप आणि सलील ची कविताही आठवत होती - 'गुलाबाची फुले दोन रोज रात्री डोळ्यांवर मुसु मुसु पाणी सांग भरतील काय...'
पण मधेच विचार करे कि काय फरक पडतोय आपण रडतोय याचा.. पण परत स्वताशीच म्हणे, निदान मनाला मोकळ तरी वाटत...

अगदी लहानपणीच आठवलं तिला - 
आई फ्रोक ची चेन बिघडली याचं दोषी तिलाच ठरवत होती. आणि ती बिचारी काहीही न बोलता गुपचूप डोळ्यांमधून टिपं गाळत उभी होती. 

बाहेर खेळायला गेली आणि धडपडून आली. गुढगा फुटला होता, आधी कुठे लागल हे बघायचं सोडून शब्दांचा मार मिळाला. मलम तर ती आधीच बाहेरूनच लावून आली होती- कसल्या तरी झुडुपाच्या पाल्याचा रस.
परत खेळायला गेली आणि परत पडून आली. मग तेव्हा तर तिने सांगितलेच नाही कि परत पडले आणि लागलं म्हणून. नशीब त्याच गुढग्यावर लागल्यामुळे दुसरीकडे कुठे जखम झाली नाही कि आईला समजलेही नाही. 
शाळेमध्ये कोणीच मैत्रीण नव्हत तिला. दुसरीमध्ये असताना तिच्या वर्गातल्या दोन जुळ्या बहिणींनी तिला बेंचवर बसण्यावरून बोचकारले होते. तिला खूप वाईट वाटले होते तेव्हा. 

कधीतरी पुढे पाचवीमध्ये तिला एक मैत्रीण भेटली. तिच्याशिवाय तिचं पान हलत नसे. तिचा अभ्यास सुधारला, तिने चित्र काढायला सुरुवात केली, कविता करायला सुरुवात केली. वर्गामध्ये ती लीडरशिप करू लागली आणि याचा सर्वात जास्त आनंद तिच्या मैत्रिणीला होई. आज तिला त्या मैत्रीणीचीही खूप तीव्र आठवण होऊ लागली होती. पण ती आता तिच्याशी बोलूही शकत नव्हती. कारण ती इतकी मऊ आणि मायाळू होती कि देवालाही तशी मैत्रीण जवळ ठेवायला आवडले. देवाने बोलावले आणि ती मैत्रीण निघून गेली. आज जे शब्द तिच्याजवळ होते ते फक्त आणि फक्त त्या मैत्रिणीची देण होते. म्हणून जेव्हा केव्हा ती लिहायला बसे तिला त्या प्रिय मैत्रिणीची आठवण झाल्याशिवाय राहवत नसे.

त्यानंतर तसं जवळच कोणीच बनू शकलं नाही. अगदी तिचा नवराही नाही, कि तिची आई सुद्धा तिच्या इतकी जवळ जावू शकली नव्हती. 
ती गेल्यापासून तिला खूपच एकट एकट वाटायचं. पण कोणाला सांगणार. देव पण असा असतो ना.

ती काहीतरी लिहायला सुरु करत होती आणि तिच्या डोळ्यातून टप टप धारा वाहू लागत. ती पुन्हा थांबे, विचारांच्या मागे पळत सुटे. गेल्या कित्तेक दिवसात ती हेच तर करत होती. 
अशा पळण्याने ती अक्षरशः खरोखरीच दमून जाई. तिला रात्री दिवसभर कुठल्यातरी खाणीमध्ये काम करून आल्यावर येतो तसा थकवा जाणावे. पण झोप मात्र येत नसे. पण याचा परिणाम म्हणजे घरातूनही तिने बाहेर पडायचे बंद केले होते.

तिला खरच कोणीतरी जवळच हव होत. पण कोणीच मिळत नव्हत किंवा कोणाचीच तिला झेलण्याची इच्छा होत नव्हती. तिला या रोज रोज विचारांच्या मागे धावण्याचा वैताग आला होता आणि खूप त्रास होत होता. कसलेतरी विचार करत बसायची आणि शेवटी रडून रडून थकून झोपून जायची. असलं जगण्यापेक्षा तिला मरून जावसं वाटायचं. 
पण परत एका मित्राची वाक्ये तिला आठवायची. कि आयुष्यामध्ये नेहमी आशावादी राहील पाहिजे - Optimist  असलं पाहिजे. आज तो तिच्याशी खूप तोडून वागतो हेही तिला लगेच त्यासोबत आठवायचे. आणि मग सगळ सगळ फोल फोल वाटायचं. सर्व खोट वाटायचं. आज तिने अशा बऱ्याच जणांना गमावलं होत. काही नियतीने हिरावून नेलं होत, काही नशिबाने तिच्यापासून दूर गेलं होत. पण देवालासुद्धा समजल नाही कि तिला खरच एका खूप समजूतदार मित्राची किंवा मैत्रिणीची गरज आहे. जो तिच्यावर मनापासून प्रेम करेल तिच्या सर्व गोष्टीमध्ये मनाने सोबत करेल. असा कोणीतरी मनकवडा, किंवा मनकवडी. 

तिने शेवटी कसबस लिहायला सुरु केलं -
'आज डोक्यामध्ये नेहमीसारखाच विचारांचा गोंधळ माजला आहे. नेहमीप्रमाणे मी विचारांच्या मागे धावत आहे आणि धावता धावता खूप थकली सुद्धा आहे. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच - "आपण कशासाठी जगत आहोत.आपल्याला नक्की काय करायचे आहे." हे असले प्रश्न आले कि परत विचारांची शृंखला सुरु होते. पण आता मला खरच या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. माणूस जन्म का घेतो? आई-वडील बाळाला जन्माला का घालतात? माणूस शिक्षण का घेतो? तो त्याची आयुष्याची काही ध्येये का ठरवतो? ती पूर्ण झाली तर तो आनंदित आणि नाही पूर्ण झाली तर दुखी का होतो? नोकरी का करतो? मैत्री का करतो? लग्न का करतो? आणि परत सर्व इथेच सोडून मारून का जातो?'
 'आई-वडिलांना खरच त्यांच्या प्रेमाचा अंश प्रत्यक्ष स्वरुपात या पृथ्वी वर आणून त्या प्रेमाला आणि प्रेमाच्या अंशाला वाढताना पाहायचे असते कि त्यांना खरतर त्यांचा वंश वाढवायचा असतो. कि खरतर हे काहीच खर नसून हा एक भावनिक खेळ मांडला आहे. जसा एक Reality Show , ज्यामध्ये आपण सर्व काम करतो पण ती खोटीच असतात शेवटी. आईच आणि बाळाच निस्वार्थ प्रेम असत तर मग आई का नाही आपल्या बाळाला सर्व काही निस्वार्थ पणे पाहायला शिकवत ? का तिचे विचार ती त्याच्यामध्ये रुजवते? माणूस हा प्रगत होत गेला तशी त्याची बुद्धी वाढली. म्हणजे तो विचार करू लागला, किंवा जास्त विचार करू लागला. 'विचार' म्हणजे त्याच मनसुद्धा हळू हळू निर्माण झाल आणि त्याचीही वाढ झाली, प्रगती झाली. प्रगती झाली म्हणजे वेग-वेगळ्या भावना अस्तित्वात आल्या. म्हणजे प्रेम-राग-द्वेष-उत्साह-दुखी या साऱ्या भावना सर्व नंतरच्या आहेत. मुळात एकच गोष्ट निरंतर राहिली - survival of fittest . म्हणजे हा मूळ विचार प्रक्टिकल आहे. आणि आज लोक सर्व प्रगती करून, सर्व भावभावना इतक्या वाढवून परत आपल्या मूळ विचाराकडेच जात आहेत. सोयीनुसार सर्वांशी वागायचं, सोयीनुसार प्रत्तेकाने एकमेकांशी संपर्क ठेवायचा, सोयीनुसार सर्वांच्या वागण्याचे अर्थ काढायचे आणि सोयीनुसार दुसऱ्यांच्या आयुष्याचे निर्णय घेवून मोकळे व्हायचे. आणि या सर्वामध्ये जर कोणी अप्रगत किंवा आदिवासी भागातले असतील तर त्यांना मात्र कोणाला एखाद वाईट वाक्य बोलल्याचासुद्धा त्रास होतो. अशा अप्रगत लोकांची प्रगती खुंटते आणि असे लोक मागे पडतात. खर तर असे लोक त्यांच्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा आजूबाजूच्या वस्तूंबद्दल जास्त जागरूक व्हायला हवेत. उदा. माझा जॉब कसा टिकेल, माझी कंपनी कशी पुढे जाईल, किंवा माझी इज्जत कशी वाढीस लागेल, मी अधिक पैसा कसा कमावेल. कारण हीच परिमाण आहेत सुखी जगण्याची, पुढे जाण्याची आणि प्रगती करण्याची. '

ती खरच चिडली होती तिच्या आजू-बाजूच्या सर्व लोकांवर - ज्यांनी ज्यांनी तिला मनाने खूप छळलं होत. ज्यांच्यासाठी तिने जीवाचं रान केल होत त्यांना आज तिची काडीची किंमत सोडाच पण त्यांच्या आयुष्यात ती होती याची आठवणसुद्धा राहिली नव्हती. असे बरेच मित्र मैत्रिणी होते. ती फिरून फिरून मित्र मैत्रिणींवर का यायची याच कारण म्हणजे ती तिच्या मित्र मैत्रिणीवरच तर जगत होती. होत तिला कोण जवळच त्यांच्याशिवाय. घरातलं आणि नातेवाइकामध्ये तर जवळच कोणीच नाही. मग राहिले मित्र-मैत्रिणीच. त्यात पण मैत्रिणीच जास्ती. कारण मित्र तर पुढे कोलेज मध्ये बनलेले. 

ती पुढे लिहायला सुरुवात करते - 
'पण सारे सगळे स्वार्थी आणि ढोंगी. ज्यांना मी माझ्या आयुष्यात इतकी महत्वाची स्थान दिली ती अशी माझ आयुष्य उजाड करून, मला एकटीला सोडून निघून गेली. जाताना त्यांना काहीच कस वाटल नाही याच मला आश्चर्य वाटतंय. का तेसुद्धा Survial of the fittest च्या तत्वामध्ये अडकले होते कोण जाणे. लोकांना माणस महत्वाची का वाटत नाहीत याच मला खूप आश्चर्य वाटत. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे - लग्न. लोक लग्न का करतात हे सुद्धा एक मोठ कोडंच आहे. काही जन सर्व करतात म्हणून करतात, काहीना माहिती असत कि शरीराची गरज भागवायची असेल तर लग्नाशिवाय कुठला नैतिक मार्ग नाहीये,  कोणालातरी आपल्या आई वडिलांसाठी लग्न करायचं असतं, कोणाला उगाच हौस किंवा मज्जा म्हणून, कोणाला हुंड्यासाठी, कोणाला वंश पुढे चालवण्यासाठी, कोणी प्रेम करतो म्हणून, तर कोणी एक काम उरकून टाकायचं म्हणून लग्न करतात. पण अजून हे लग्नाचं कोड मला तरी उलगडलेलं नाहीये. लोक प्रेम करतात म्हणजे काय हेही मला ना उलगडलेलं अजून एक कोड आहे. किंवा आधी मला वाटायचं कि प्रेम म्हणजे एकमेकांची मनापासून वाटलेली काळजी. त्या काळजी पोटी आपण ज्यावर प्रेम करतो त्याला खुश ठेवण्याची धडपड. त्या खुशीसाठी काहीही करायची तयारी. आणि काहीही करताना त्याचा मोबदला मिळावा असे मनातही न येणे. प्रेम म्हणजे एका मैत्रिणीवरही असू शकते, भावावरही असते, आई वर असते, काकांवर असते, आजोबा-आजीवरही असू शकते, आयुष्याच्या जोडीदारावरही असते, आणि ते स्वतावारही असू शकते. पण जेव्हा मला यांपैकी बऱ्याच जणांनी माझी हि व्याख्या चुकीची ठरवली, यातली काही लोक मला प्रेम करायला जवळ लाभलीच नाहीत आणि काहींच्या जवळ मी जावू शकले नाही. तेव्हापासून मला फक्त शेवटच वाक्य पटत कि - प्रेम हे फक्त स्वतावरच असू शकत. आणि कोणावरच नाही. आई-वडीलसुद्धा आपल्या मुलांकडून अपेक्षा करतातच कि. आणि अपेक्षा भंग झाली कि त्यांना दुखही होते आणि ते दुख वेग-वेगळ्या मार्गाने व्यक्तही होते. आणि माझ्या आजूबाजूच्या या लोकांनीच मला माझी प्रेमाची व्याख्या बदलायला लावली. '

'हे असंच होत. आजकाल मी असेच विचार करत बसते. मधूनच काहीबाही आठवत रहात आणि बर्रोब्बर वेळेलाच मला आठवत. आणि मग असेच रागाचे ज्वालामुखी मनामध्ये आणि डोक्यामध्ये धुमसत राहतात. सर्व लोकांचा राग राग येत राहतो. आणि मग माझंही मन नकळतपणे ठरवू लागत, कि सर्वाना एकदा अद्दल घडली आणि घडवली पाहिजे. माझे दिवस सुरु झाले कि एकेकाची अश्शी जिरवेल ना मग कळेल या सर्वाना कि मी काय चीज आहे. आणि अगदीच नकळतपणे मीसुद्धा त्या नियमाला माझ आयुष्य जगण्याच परिमाण करू पाहते - Survival of the fittest .' 


P . S . - 'असंच विचारांच्या मागे धावून धावून मी थकून जाते. इतका वेळ निद्रादेवीची केलेली आराधना फळास येते. आणि हळू हळू झोप मला येण्यास सुरुवात होते. .........   

शब्द मनीचे

आज काल मी फिरत असते वाऱ्याच्या रस्त्यावर,
शोधात असते आठवणी पाला पाचोळ्यावर,
मन माझे कुठे तरी पळून गेले आहे,
आणि मी फक्त जागतिये काही उधार श्वासांवर...  

हट्टाने बाधलेले घरटे आणि मांडलेला संसार,
उधळलेल्या  सावल्या अन घुसमटलेला हुंकार,
काहूर जेव्हा उठते ठायी,
तेव्हा पटते, हाताचे सोडून आहे मी पळत्याच्या मागावर...
बस्स जागतिये काही उधार श्वासांवर...

आता काय विचार करते कळेनासे होते,
हसण्याच्या वेळी उगाच भरून येते..
गुलाबाचे सुगंध आता सरू लागले,
मागे उरले काटेच काटे...

दूर पाहते आकाशाच्या वर,
कुठून कानी पडतो का आशेचा स्वर,
जोवर आहे त्या विधात्याचा आधार,
तोवर माझ्या प्रयत्नाचा भार..
बाकी स्व-सोडून आता सर्व काही,
त्या जन्मदात्याच्या ऋणाची होऊ कशी मी उतराई.. 
     

Sunday, August 19, 2012

विश्लेषणात्मक


(आदरणीय राजीव उपद्ध्ये यांनी त्यांच्या ब्लोग वर जो लेख प्रसिद्ध केला त्यावरील संश्लेषण. ब्लॉगची लिंक दिली आहे खाली. आधी त्यांचा लेख वाचा म्हणजे खालील टिप्पणी समजण्यास मदत होईल. )

http://rajeev-upadhye.blogspot.in/2009/07/blog-post_30.html


सर, तुमचा अनुभव आणि कार्य खूप मोठे आहे. पण तरीही मला काही मुद्दे इथे नमूद करावेसे वाटतात. 
तुमचे लिखाण, माझ्या मताप्रमाणे मला, सार्वत्रिक वाटत नाही. मी तुम्हाला पुरुषप्रधान आहात असे कुठेही म्हणणार नाही. पण तुम्ही ज्याप्रमाणे "मुक्त स्त्री" ची जी व्याख्या केली आहे ती थोडीशी चुकीची वाटते. तुमचा आधार कदाचित Metropolitian Cities मधल्या स्त्रियांबद्दल असेल तर ठीकच आहे. भारत हा अजूनही खेड्यांचा देश आहे, इथे हजारो गावांमध्ये अजूनही लाईट पोचलेली नाहीये. त्यामुळे जेव्हा आपण 'स्त्री' किंवा 'पुरुष' यांच्याबद्दल सार्वत्रिकपणे बोलतो तेव्हा फक्त शहरातल्या लोकसंख्येचा  विचार करून बोलणे चुकीचे ठरेल. 'घटस्फोट' हा शब्द आज शहरी भागामध्ये रुळला जरी असला तरी मोठी शहरे सोडली, पुणे-मुंबई-चेन्नई-नागपूर-दिल्ली इ.इ., तर बाकी तर अजूनही ग्रामीण भागच आहे. आणि या भागामधील स्त्रियांचा विचार करणेही गरजेचे आहे असे मला वाटते. अजूनही स्त्री हि उपभोगाची एक 'वस्तू' म्हणून जेव्हा पुरुष तिच्याकडे पाहतो तेव्हा समाज हा २०० वर्षेच काय पण १००० वर्षे मागे असल्याचा पुरावा सापडतो.  

" आजची स्त्री मात्र पूर्ण वेगळी आहे. ती एक तर मुक्त आहे किंवा मुक्त होण्यासाठी धडपडत आहे, मग ती समाजाच्या कोणत्याही थरातील असो." 
तुमचे म्हणणे कदाचित एखाद्या दुसऱ्या देशाबाब्तीत जसे कि यु.के., अमेरिका,  १००% खरे होईल. पण भारत आणि भारतासारख्या, कांगो, आफ्रिकेतील बरेच मागास देश यांच्याबाबतीत आपले विधान चुकीचे ठरेल असे म्हणण्यास मला खेद वाटतो. आपल्या या वाक्याचे संदर्भ तुम्ही विस्तृत केले तर वस्तुस्थिती लक्षात येईल. आजची स्त्री पुरुषापासून, किंवा कोणत्याही जबाबदारीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत नसून; तिला ज्याप्रमाणे 'चूल आणि मुल' या गोष्टीला जखडलेले आहे आणि स्त्रीने फक्त हेच करावे हि जी समाजाची मानसिकता आहे त्या मानासिक्तेपासून ती मुक्त होऊ पाहत आहे. जी मानसिकता स्त्रीला आखाड्पणे बोच्कारते आहे. आणि या समाज म्हणवणाऱ्या लोकांमध्ये जसे पुरुष आहेत तशा काही स्त्रिया खुद्द आहेत ज्या दुसऱ्या स्त्रीच्या मार्गात अडसर बनत आहेत. त्यामुळे मी कुठेच असे म्हणणार नाही कि 'पुरुष' सर्व गोष्टीला जबाबदार आहेत. जबाबदार आहे ती - मानसिकता, जी अजूनही १००% बदललेली नाहीये. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे जेव्हा माणूस जंगलामध्ये राहत होता तेव्हा जंगली प्राण्यांपासून रक्षण करणे, शिकार करणे, शत्रूपासून रक्षण करणे हि कामे पुरुषाने स्वीकारली किंवा त्यांच्या जास्त शारीरिक क्षमतेमुळे त्यांना हि कामे निसर्गदत्त मिळाली आणि त्याच वेळी प्रजोत्पादन, मुलांचे संगोपन, घराची साफसफाई (त्यावेळी गुहेत माणूस राहायचा), आणि इतर कमी कष्टाची कामे स्त्रीने स्वीकारली किंवा तिला ती निसर्गदत मिळाली. पण आज पुरुष हा फक्त काही शारीर कष्टाचीच कामे करतो असे नाही, जिथे बुद्धीची आवश्यकता असते अशी बरीच कामे आहेत. आणि जस - जशी प्रगती होऊ लागली तशी स्त्रीला जेव्हा ती करायची इच्चा निर्माण झाली  तेव्हा या गोष्टी कुठेतरी नाकारल्या गेल्या त्या जंगलात राहण्याच्या मानासिक्तेवारच ना. माणूस खूप पुढे आला, पण स्त्रीबद्दलचे विचार आणि पुरुषाबद्दलचे विचार हे कदाचित आपल्या जनुकामध्ये खोलपर्यंत रुजले आहेत. आपण आज घरात राहतो, बंगल्यात राहतो, खेड्यांचा विचार केला तर वाड्यामध्ये किंवा झोपाद्यामध्ये राहतो. माणसाने शिक्षण पद्धती निर्माण केली त्याचे मूळ म्हणजे माणसाने स्वताला आणि समाजाला सुसंस्कृत, आरोग्यपूर्ण, भावी पिढीला जगण्यास सुसज्ज आणि स्वताला समृद्ध बनवावे यासाठी. आणि स्त्री सुद्धा माणूसच आहे, समाजाचा भाग आहे. जेव्हा तिला हे नाकारले जाते तेव्हा ती कुठेतरी या नाकारण्याच्या मानसिकतेपासून मुक्त होऊ पाहते, मुक्त होण्यास बंड करते. पण तिचे हे बंड फक्त एका पुरुषाशी नसून, समाजाशी आहे. 
आज शहरांमध्ये तुम्ही म्हंटल्याप्रमाणे परिस्थिती आहे. स्त्री हि तिला मिळालेल्या कायद्यांचा दुरुपयोग करत आहे, घटस्फोटासारखा निर्णय चुटकीसरशी घेते, तिच्या बिदागीसाठी ती कोर्टामध्ये केस फायली करते. जोब करणारी स्त्री असेल तर ती तिच्या स्त्रीत्वाच्या जोरावर आणि सहानुभूतीवर कदाचित यशाच्या पायऱ्या चढत असते, किती वेळा यामुळे खर्या खुर्या कष्टाळू पुरुषाच्या मार्गामध्ये अशीच एखादी स्त्री येत असेल, सुखवस्तू घरातून जेव्हा लग्न होवून स्त्री आपल्या सासरी जाते आणि जेव्हा तिच्या मनाप्रमाणे काही झाले नाही तर ती त्याला 'छळ झाला' असे म्हणून माहेरी निघून जाते. 
बऱ्याच सुना किंवा सासवा आपली जबाबदारी झटकून वागत असतात. आणि कदाचित एका सुनेच्या विचारसरणीला दुसरीच सासुच कारण असेल. पण हे सर्व जास्तीत जास्त शहरांमधली बाजू दर्शवते. ग्रामीण भागात आत्ता कुठे मुली दहावीपर्यंत शिक्षण घेवू लागल्या आहेत. त्या आत्ता कुठे खऱ्या स्वातंत्र्याला समजू लागल्या आहेत. त्यांच्याबद्दल हे विधान चुकीचे ठरते. 
केवळ शहर्यातल्या लोकसंखेच्या आधारावर आपण पूर्ण प्रदेशाचे सामिक्षीकरण करू शकत नाही. 
आणि काही गोष्टीला केवळ स्त्री जबाबदार आहे असे म्हणता येणार नाही, आज जी छोटी कुटुंबे असतात, व्यापारीकरण, मॉल संस्कृती, आई-वडिलांनी आपल्या मुलांना सहज उपलब्ध करून दिलेल्या गोष्टी यामुळे पुढे जावून अशा वातावरणात वाढलेली मुलगी सासरी जावून तशीच वागू शकते. याला केवळ तिचे स्त्रीत्व जबाबदार नसते. 
आणि राहिली गोष्ट विवाह बाह्य संबंधांची, तर तुमचे विधान मी पूर्णपणे नाही पण अर्धे चुकीचे आहे असे म्हणेल- माझ्या या म्हणण्याला माझ्याकडे आधार आहेत आणि हे विधान मी Generalisation पद्धतीने करत आहे.

बाकी तुम्ही खऱ्या सप्तपदीचे महत्व, त्याचा इतिहास, किंवा त्याचे धार्मिक महत्व आधी काय होते आणि आत्ता काय असायला हवे, किंवा जी सात वचन आहेत त्यामागचे विवेचन,  ते आज का करावे किंवा करू नये याची माहिती लेखामध्ये दिली असती तर लेख अजून उपयुक्त झाला असता. आणि ज्यावेळी तुम्ही पुरुषाची बाजू मांडलीत त्यावेळी स्त्रीसाठी याचे महत्व, समाजामध्ये या रिती-रिवाजांचे स्थान  हे सुद्धा मांडायला हवे होते. म्हणजे हा लेख बराच त्रयस्थ पद्धतीचा वाटला असता.

असो. सर तुम्ही खूप अनुभवी आहात, त्यामानाने मी खूपच लहान आहे. तुमच्या लेखात काय असायला हवे हे मी ठरवू शकत नाही. पण जेव्हा लेखक काही लिहितो तेव्हा त्या विषयाला अनुसरून वाचकाच्याही काही अपेक्षा असतात. कदाचित या अपेक्षेतूनच मी हा लेख लिहिला. पण शेवटी त्यावरून आपण आपले विचार बदलू शकत नाहीत आणि लेखनही. पण वाचकांच्या विचारांचे स्वागत नक्कीच करू शकतो. आणि आपल्या जेव्हा मनापासून पटेल तेव्हा आपण अंगिकारू शकतो.  आणि जर आपल्या लेखनाचा काही चुकीचा अर्थ कोणत्या वाचकाने घेतला असेल तर त्यातील मुल मुद्दा आपण वाचकाला समजावून सांगू शकतो. मी माझे विचार व्यक्त करताना कुठे चुकून तुमच्या भावनांना दुखावले असेल तर क्षमस्व. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे.  
धन्यवाद.     

(माझ्या या लेखात मी थोड स्त्री आणि पुरुष या दोन जातींविषयी लिहायचा प्रयत्न केला होता. ते अवश्य वाचावे.
'याला जीवन ऐसे नाव'.)

Friday, August 17, 2012

गडबड गोंधळ

कधी कधी सहज सुंदर
नयन मनोहर

उगाच हुरहूर
अखंड बडबड
मनात काहूर
क्षणात भण भण
हसू मण मण

पाण्यात तरंग
आकाशाचे रंग
उशीत डोके
डोळ्यात झोप
झोपेत स्वप्न
स्वप्नात जग

येणे झपझप 
जाणे झर झर 
हाताशी हात
स्पर्शात बात
उरात धडधड 
डोक्यात पडझड

उगीच लोळणे 
मधूनच हसणे 
शून्यात जाणे

गर्दीत शांत
एकट्यात वाद

पंख्यात वारा
पावसात गारा
उषेचा सूर्य
चंद्राचा पसारा
उजळू पाहे 
आसमंत सारा

अजून काही
मनात बाही
ओठात नाही
नजरेत पाही
ओळखून घेई

घडी हाती
नाही म्हणता
रुसनेच बहुदा
गुस्सा नाही
रागाचा तोरा

अजून पुढे
क्षितिजाच्या इथे
धरती जिथे
मिळे आकाशाशी
हितगुज चाले
कधी न कळले
नाहीच उमगले
जवळच गवसले

पाण्याचा झरा
फुलांचा सडा
रांगोळी वेलीची
सळसळ पानांची

असाच एकांत 
पकडण्या चिमटीत 
प्रयत्नले.

अजून पुढे,
पडली गाठ
तरी न आठव
आसवांची
जिकडे प्रकाश
तोच माझा प्रांत 
कहाणी गडबडलेली 
जन्माची भ्रांत ...


Friday, August 10, 2012

डायरीच पान


(सन १९०२, वय १४ वर्षे,  पान नं. ७६ )
शेजारच्या काकू सांगतात कि मी इथे ७ वर्षाची असताना लग्न करून आले, तेव्हा खूपच खोडकर आणि सारखी खेळायला पळणारी होते, पण आता मी खूपच शांत झालीये. मला नाही वाटत कि मी शांत झालीये. अजूनपण मी मंगळागौरीला, पंचमीला खूप खेळते. खूप मज्जा येते पंचमीला आई कडे जायला. आज मी शंकरपाळे बनवले, आत्याबाईना आवडले आणि मला मस्त वाटलं. उद्या करंजी शिकणारे मी त्यांच्याकडून. ह्यानापण खूप आवडते करंजी. मोठ्या वाहिनी आणि मी यावर्षी पंढरपूरला जाणारेत. खूप मज्जा येईल. हे आले तर अजूनच मज्जा येईल. काल ह्यांना मी जेवायला वाढले तेव्हा त्यांच्याकडे पाहता पाहता मी आमटी ताटामधेच वाढली. मामंजींनी एकदम रागानेच पाहिलं माझ्याकडे. पण मज्जा आली यांच्याकडे पाहताना. उद्या सकाळी आत्याबाई नी द्यायच्या आधी मीच यांना चहा नेवून देणारे. चला आता झोपते पटकन.

(सन १९४२, वय १९ वर्षे, पान नं. १४९ )
आई आणि अण्णा खूपच काळजीत आहेत, लग्नच जमत नाहीये म्हणून. आई तर म्हणते आता कोणी विधुर किंवा मोठ्या वयाचा असेल तरी चालेल, पोरीला उजवून टाकली पाहिजे. पण मला काही चिंता नाहीये. शेजारच्या टेंभी सारखा फुकटा नवरा करून घेण्यापेक्षा असाच राहील तरी चालेल. म्हणजे मला चालेल, आई  अण्णांना नाही चालणार.
पण मला तर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी लढनाराच नवरा हवा, आई अण्णांना कस सांगू हे. एकदम तगडा, सतत कुठल्या ना कुठल्या चळवळीत मग्न असणारा, मी त्याच्या साथीने भाग घेईन या लढाई मध्ये. मला तर कधी एकदा त्या मोर्च्यामध्ये जाते असं होतंय. त्या पलीकडच्या आळीतल्या बायका नाही का जात त्यांच्या घराच्या पुरुष मंडळींसोबत. आमचे अण्णा म्हणजे मुळचेच घाबरट आहेत. मी एकदा हिम्मत करून विचारलं तर तेव्हापासून आई ने लग्नाचा चंगच बांधलाय. आता नक्कीच आत्त्याच्या मुलाशी, ज्याची एक बायको आधीच स्वर्गवासी झालीये, त्याच्याशी लग्न लावून देतील. एवढ वय झालाय म्हणून मला बाहेरही पडायची भीती.  अरे बापरे, अण्णा आले वाटत. चला झोपते नाहीतर काय लिहिते ते येवून बघतील.

(सन १९६२, वय १२ वर्षे, पान नं. ४३)
आज शकुच्या हळदीचा कार्यक्रम होता. किती छान दिसत होती ती. मीसुद्धा हट्ट धरला आई जवळ कि मलापण लग्न करायचं. तर भाऊ हसायलाच लागले, मला म्हणाले, "सुमे, तुला रमाबाई सारख डॉक्टर व्हायचं. इतक्यात लग्न नाही. अजून उशीर आहे. " पण गाव सोडून इकडे आल्यानंतर फक्त शकूच ती काय माझी मैत्रीण होती. आता तीपण लग्न करून जाणार म्हणजे मी एकटीच पडणार. गावी कित्ती कित्ती मज्जा यायची. इथे या शहरात तसे काहीच नाही. 
आणि आई काय म्हणाली माहितीये, "सुमन तुला लग्न म्हणजे काय ते तरी कळत का? आणि तू लहान आहेस अजून." ती कधी शाळेत नाही गेली, मग माझ्या का मागे लागते शाळेत जा म्हणून. आणि तिला काय माहिती, मला माहितीये लग्न म्हणजे काय ते. गावी असताना भाऊ कसे आई साठी शेतातून येताना गुपचूप मोरपीस घेवून यायचे. मेहंदीच्या झाडाची पान घेवून यायचे, आईला मेहंदी खूप आवडते म्हणून. मग आई ती पान वाटून कुटून त्याची नागमोडी नक्षी तिच्या आणि आम्हा सर्वांच्या हातावर रंगवत असे पंचमीला. आई आणि भाऊ, दर वर्षी गावाच्या जत्रेत दोघंच मिळून जायचे. आम्हा पोरांना घरीच ठेवून. आणि आई सुद्धा आज्जीने कितीही रागवल तरी जायची. खंडोबाला जेव्हा भाऊ जायचे तेव्हा आई एकदा खूप आजारी होती तरीसुद्धा तेव्हा तिने फराळ बनवून दिला होता भाऊ सोबत. मग असं आई आणि भाऊ सारख राहाण, फिरणं, सोबत करणं, एकमेकांच्या आवडी निवडी जपण म्हणजेच लग्न ना. आता शकीला पण तिचा नवरा गुपचूप बाहेरून वडापाव आणून देईल. आणि तीच आणि माझ वय तर सारखंच आहे. तरी म्हणे कि मी लहान आहे. नाही मला लग्न करायचंच आहे.

(सन १९८२, वय २०, पान नं. ३११)
आज तो दिसला नाही कोलेज मध्ये. मन लगेच अस्वस्थ होत, तो नाही दिसला तर. कुठेतरी कादंबरीमध्ये हे असं झाल कि याला प्रेम म्हणतात, असं वाचलंय. पण छे, मला नाही वाटत. कदाचित मला सवय लागलीये त्याला रोज पहायची, दिसला नाहीतर शोधायची. एकदा तो दिसला कि कस शांत शांत वाटत. कधीतरी वाटत कि त्याने येवून बोलाव, मी त्याला माझ्या नोट्स द्याव्यात. सोबत अभ्यास करावा. त्याच्यासोबत केला तर किती अभ्यास होईल नाही माझा, उगाच लायब्ररी मध्ये त्याला शोधायचा वेळ तरी वाचेल. खरच यालाच प्रेम म्हणतात का? पण काय उपयोग ! जर हे प्रेम असेल तर त्यालापण माझ्याबद्दल असं काहीतरी वाटलं पाहिजे तर मज्जा आहे. नाहीतर एकाच बाजूने काही उपयोग नाही. अरे मी विसरलेच, कि मला कळणार कस कि त्याला पण मी आवडते का ते. मी त्याच्याशी असं काही जावून विचारू शकत नाही. आणि जरी काही त्याला वाटत असलं तरी आमचे पिताश्री, आजोबा, काका, आत्या, मातोश्री या सर्व मिळून मला आणि त्याला सुळावरच चढवतील. बरंय, हे असाच छान आहे. त्याला रोज रोज शोधण. यातपण मज्जा येते. 


(सन २००१, वय २४, पान नं. ६३४)
आता घरी लग्नाचे विषय सुरु झालेत. डिग्री झालीये, जॉब शोधत आहे. पण घरी अजून अनुजबद्दल बोलले नाही. एकदा त्याला जॉब मिळू देत मग बोलेन. असे दिवस उडून गेले ते कळलहि नाही. आत्ता परवा तर अनुजची आणि माझी भेट झाली होती. 
मला असं वाटायचं कि, हात हातात पकडून कधीच न सोडून जाणारा जीवन साथी हवा. अखंड सोबत करणारा. जो फक्त असं नाही म्हणणार, "हे बघ, हा रस्ता आहे यावरून तुला चालायचं आहे." पण तो अखंडपणे त्या रस्त्यावर माझ्यासोबत चालत राहील. मी कुठे अडखळले तर मला सावरून घेईल. त्याच्या आणि माझ्या वाटा एक आहेत असं कोणीतरी पाहिजे होत मला. हवेवर माझे केस उडताना माझा चेहरा झाकून टाकतील, मी पुन पुनः केसांच्या बटा कानाच्या मागे करेन आणि तरीही वारा हट्टाने परत केसांची उलथापालथ करेल. आणि असं वाऱ्याशी झगडताना त्याने माझ्याकडे एकटक पाहत राहावं. मी दिलेल्या पत्राचे दिवसातून चार वेळा पठण करणारा, मला रोज पाहिल्याशिवाय त्याचा दिवस सुरूच झाला नाही असं मानणारा.  मी जेव्हा त्याच्यासाठी कर्वा चौथ च व्रत पकडेन तेव्हा ऑफिस वरून धवत पळत माझ्यासाठी घरी लवकर येणारा. मी रुसले, आणि जेवले नाही तर तोही न जेवणारा. एकमेकांकडे तासनतास पाहण्यात किती मज्जा येते नाही.
त्या सर्व गोष्टी माझ्यासोबत उत्साहाने करणारा ज्या मला करायच्या होत्या पण मी आजपर्यंत केल्या नाहीत- कारण माझी आई म्हणायची कि जे करायचं ते नवऱ्याच्या घरी जावून करायचं, म्हणून मी इतकी वाट पाहिलेली त्या सर्व गोष्टी करण्याची.
माझ्यासोबत मस्ती घालणारा. आयुष्य एक जगायची गोष्ट समजणारा, ना कि रेटायची. 
जो त्याची प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करणारा. त्याच्या सुखाचा आणि दुखाचा खरोखर भागीदार मला म्हणणारा. 
असं कोणीतरी, कि ज्याच्यासोबत मलाही रहावस वाटावं. असं कोणीतरी हव होत कि ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा. त्याने प्राण जरी मागितला तरी मी तयार होईल, असा कोणीतरी. ज्याच्यासाठी मला माझ सर्वस्व विसरून त्याच्यात विलीन होण्यात दुख किंवा परोपकार वाटू नये, तर आनंद व्हावा असा. ज्याची स्वप्न पूर्ण करण्यात मला हातभार लावायचा होता, आणि त्याची स्वप्न पूर्ण होताना मला त्याला हसताना पाहायचं होत, असा कोणीतरी. 
रात्री १ वाजता मला बाहेर बाईक वर फिरायला घेवून जाणारा, थोडक्यात आयुष्य फुल्टू जगणारा. आयुष्यातले छोटे छोटे आनंद जगण्यासाठी सदैव तयार असणारा, ना कि विकेंड ला घरी घोरत पडणारा. मला त्याची जिवाभावाची मैत्रीण बनवणारा. असा कोणीतरी.

आणि तो अनुज भेटला. अगदी तसाच, किंवा याच्या दोन पावलं पुढेच. 
घरून लग्नाला विरोध होणार हे माहितीये मला. पण मी तयार आहे. सगळ्यांना पटवून दाखवेन कि अनुजच तो आहे ज्यासोबत मी लग्न केल पाहिजे. आई - पप्पांना पण पटेल हे आणि ते नाकी हसत हसत मला परवानगी देतील.

(सन २०१२, वय २७ वर्षे, पान नं. ३४)
आज परत ब्रेक अप झाल. last time प्रतोत सोबत, त्या आधी विजय. आणि आता राहुल सोबत पण. साले सर्वाना फक्त कीस पाहिजे असत. पण, यांच्यापैकी कोणी तरी त्या लायकीच तरी होत का. Now enough is enough . इथून पुढे मी डेटिंग करणारच नाही. आणि आरे लग्न करायचं आहे मला, ते काही फक्त शरीर सुखासाठी नाही. ते तर माझ्या boyfriend कडून पण मला मिळू शकलं असत. मला नवरा हवाय. जो आयुष्यभराचा वादा करेल. ज्याच्यासोबत मला माझ यश-अपयश सुखानं वाटायचं आहे. मी bold आहे, याचा अर्थ असा नव्हे कि माझ्यासोबत काहीही चालत. मी पण एक मुलगीच आहे. मलाही कुठेतरी जावून स्थिर वायचं आहे. I agree , कि मी काही perfect नाहीये. आणि मला Mr Perfect नकोय पण. पण जो माझ्यावर मनापासून प्रेम करेल, आणि मीसुद्धा ज्याच्यावर. खूप प्रेम करेल असा मुलगा हवाय. मिळेल का मला असा मुलगा ? 

विजय ने मला डिच केल ना तेव्हाच मी ठरवलं होत कि आता no boyfriends . पण मग मम्मा मागे लागली, आता लग्न कर म्हणून. मग तो प्रतोत. तो मॉम च्या मैत्रिणीचा मुलगा. तोही तसलाच. and Rahul was height of all this bloody shit . मला आता लग्नच करायचं नाही. 
खरच मम्माचा time किती चांगला होता, atleast विश्वास तरी ठेवण्यासारखी लोक होती तेव्हा. पण आता. no hopes at all ...

-----------------------------------

(सन २०१२, वय ७३ वर्षे, डायरी नं. ४ किंवा ५, पान नं. २१०)

खरच आयुष्याची उजळणी करताना आता जाणवतंय कि सुखाचे क्षण कोणते असतात ते. आपल्या जोडीदाराचा शोध हा कोणताही मोठा जॉब मिळवण्यापेक्षा आणि कॅरिअर पेक्षा किती महत्वाचा असतो ते समजतंय.
लग्नानंतर दोन वेग-वेगळे जीवन जगणारी लोक एकत्र येतात कशी, आणि एकमेकांचे होवून जातात कशी हे जेव्हा या अशा उतार वयात समजत नाही तेव्हा त्या लग्नांना यशस्वी लग्न म्हणता येईल. आणि आत्ताच प्रेम म्हणजे काय हे उमगेल. आत्ता लक्षात राहतात ते फक्त पहिल्या वहिल्या हातात हात घेतल्याचे स्पर्श. पहिल्यांदा ओठांनी ओठांशी केलेल्या सलगीचे स्पर्श कुठे स्मरणात पण राहत नाहीत. 
थोडक्यात शरीराची गरज एका वयापुरती असते. पण मनाच्या सोबतीची गरज हि निरंतर असते. त्या उपभोगाचा मागमूसही आता आपल्या गावी नसतो. आठवतो तो फक्त प्रेमाचा स्पर्श - कधी आठवतो तो नवीन लग्न झाल्यानंतर नवऱ्याचे आपले फोटो काढण्याचे वेड, तर कधी त्या मंडपातून आई वडिलांना सोडताना वाहत असलेल्या अश्रुना पुसलेला हात, कधी गर्दीमध्ये चुकामुक होऊ नये म्हणून एकमेकांचा घटत पकडलेला हात. बसमध्ये तिच्या खांद्यावर ठेवलेलं डोक आणि त्या निवांत झोपेचा क्षण. कधीतरी स्वताच्याशी नकळत जोडीदाराच्या आवडीच्या केलेल्या गोष्टी. ती समुद्र किनारी चंद्राला पाहत गप्पा मारत घालवलेली रात्र. 

खरच, आज मला यांच्या अशाच कितीतरी गोष्टी आठवत राहिल्या, ज्या कदाचित मी इथे या डायरीच्या पानावर शब्दामध्ये मांडू शकणार नाही. आणि खरच मी खूप आभारी असेल त्या देवाची, त्या विधात्याची ज्याने माझ्या आयुष्यामध्ये असे क्षण लिहून ठेवले. आणि माझ्या या जोडीदाराची ज्याने माझी अखंड सोबत केली, आणि अजून करत आहे. मी खूप सुखी आहे. 
आज खूपच छान वाटत होत. आणि जेव्हा त्यांनी नोकराकडून चहा मागवला, तेव्हा अगदीच क्वचित व्हीलचेअर वरून काम करणाऱ्या माझ्या शरीराने ठरवलं कि 'आज अपने यार के लिये एक अद्रक वाली चाय तो बनती है - उसके प्यार के लिये एक बडिया चाय उसके पसंद वाली.'     


Tuesday, August 7, 2012

चांदणं - ८


"मराठी पुस्तक प्रदर्शन आणि संमेलन - नवोदित लेखक आणि लेखिकेंसाठी. "
जान्हवी pamplet वरची जाहिरात मोठ्याने वाचून दाखवत असते.
"ए आपण जायचं का? शनिवारी आहे. पण आदी तुला सुट्टी घ्यायला जमेल का? कारण तू नवीन जॉईन झालास ना."
"खर तर नाही जमणार मला आता. ट्रेनिंग आहे ना त्यात अजून. सुट्टी घेण म्हणजे आपल्या पायावर दगड मारून घेण. आणि आई येणारे या शुक्रवारी. चार पाच दिवस असेल ती. मग नाहीच जमणार. काय वेळ काय आहे प्रदर्शनाची ?"
"जावूदेत ना तुला जमणार नाही तर कशाला हवीये वेळ. सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आहे. मी हाफ डे घेवून २.३० वाजता जाईन. तुला कोणता पुस्तक हव असेल तर सांग घेवून येते. " 
"अग नको, सध्या वेळच नाही वाचायला. तू ये जावून."
(जान्हवी स्वागत - 'जस काही जॉब यालाच लागलाय आणि जगामध्ये हा एकटाच जॉब करतो. आई येणारे तर साध घरी पण बोलावलं नाही. जावूदे. मीपण बघ तुला दाखवते कशी बिझी असते ते.')
.........

"हेलो जानु, अगं आज प्रदर्शन आहे ना? तू जातीयेस ना? "
"हो मी पोचालीये तिकडेच. का रे? "
"अग मला एक पुस्तक हवाय, तुला तिथे सापडलं तर पाहशील का?"
जान्हवी प्रदर्शनाच्या दाराकडे चालता चालता विचारते - "कोणत पुस्तक?"
"आम्ही दारात उभे आहोत तुमच्या स्वागतासाठी "
"हे कसले पुस्तक?"
"अगं कवितेच पुस्तक आहे. बघ सापडताय का ते."
आणि फोन वर बोलता बोलता ती एका माणसाला जोरात धडकते. सॉरी म्हणायला ती वर बघते तर - आदित्य साहेब.
ती एक क्षण आश्चर्याने तर दुसर्या क्षणी रागाने बघू लागते. 
"अच्चा हे आहे का तुझ पुस्तक."
प्रदर्शनामध्ये भूश्या, अडीच बी.कॉम. चा मित्र भेटतो. कॉलेजनंतर इतक्या दिवसानंतर आदीच्या आणि भूश्याच्या खूप गप्पा रंगतात. त्या पुरुशोत्तामच्या नाटकाची, त्या कवितेची आणि जान्हवीची ओळख या सर्व गप्पा होतात. जान्हविचीही ओळख होते भूषण सोबत. 
"मग आदि पुढचे प्लान आहेत काय तुम्हा दोघांचे ?"
आदी आणि जानु एकमेकांकडे पाहून नुसते हसतात. 

प्रदर्शनातून जानूच्या स्कुटी वरून दोघ घरी यायला निघतात. जानु गाडी चालवत असते, तिचे केस वाऱ्यावर भुरभुरत आदीच्या चेहऱ्यावर गुदगुली करत असतात. आणि असे क्षण आदिला जगातल्या सर्वांत सुखाच्या क्षणांसारखे वाटत. तो स्वताशीच मंद मंद हसत असतो. जानुची मात्र अखंड बडबड सुरु होती. आदीच मात्र त्याकडे अजिबात लक्ष नव्हत, त्याच्या कानावर तिचे शब्द पडत होते आणि चेहऱ्यावर वाऱ्याच्या तालावर ताल धरणारे केस,  मधूनच तिची ओढणी. तेवढ्यात ती विचारते, "तुझी मम्मी कधी पर्यंत आहे घरी?" आणि आदीच लक्ष नसल्यामुळे तो काहीच बोलत नाही. ती परत तोच प्रश्न विचारते पण त्याला लक्षातच येत नाही. तो असाच गाल्यातल्या गालात हसत असतो. ती गाडीच्या आरश्यामध्ये त्याला हसताना पाहते आणि जाम भडकते. त्याला गाडी चालवत असतानाच जोरात चिमटा काढून विचारते कि का हसतोस म्हणून. मग आदिला लक्षात येत कि ती काहीतरी विचारात होती. पण आता वेळ निघून गेलेली असते, कारण जानु काही शांत होणार नाही हे त्याला लक्षात येत. मग तो तिच्यासाठी काही ओळी गुणगुणतो -

तुझ्या चिडण्याचे प्रकार निराळे,
प्रेमाचीही तीच गम्मत,
केसांच्या बटामध्ये गुंतून जावे,
अन बोलण्यातले लक्ष थिजावे..
क्षणो-क्षणी का भिरभिरते मन माझ माझे - अर्थ काही उमगले नाही...   
ओढ कशी लागली तुझी मजला कळले नाही,
खंत आता हीच फक्त कि तू जवळ नाहीस,
उगाच काहूर का माजे सांजवेळी,
समोर तू असूनही कासावीस मन माझे - कारण मात्र समजले नाही..

त्याच शेवटच वाक्य संपत आणि ती खळखळून हसायला लागते. "बाकी काही म्हण हा तू आदी, तुझी हीच अदा आपल्याला जाम आवडते."
"ए , अदा हि मुलीना असते. मुलांना style असते. हे अदा बिदा असलं मला म्हणायचं नाही." 

चांदणं - ७



"हे बर आहे, आमच्या जोरावर तुम्ही पुस्तक पण छापायला लागलात, हं ??" स्टेज वर चढता चढताच गर्दीतून मागून कोणीतरी आदित्य ला हटकल  होत. तो मागे वळून त्या गोंगाटातून येणाऱ्या ओळखीच्या आवाजाच्या दिशेने पाहतो तर जान्हवी होती मागे. तेवढ्यात गर्दीतून धक्काबुक्की करत प्रेस वाले लोक आले, आदित्य स्टेजवर गेला. त्याच्या पहिल्या कवितेच्या पुस्तकाला पुरस्कार भेटला होता. पुरस्कार घेवून, आणि आभाराचे दोन शब्द बोलून तो लागलीच खाली आला. स्टेजच्या मागे जान्हवी त्याची वाट पाहत होती. तो येताच तिने तिच्या पर्स मधून एक गुलाबाचे फुल आणि एक ग्रीटिंग कार्ड काढले. "अभिनंदन आदी."
"काय हे जानु, तू पण ना. पण तू तर अजिबात येणार नव्हतीस ना. मग कशी आलीस? मी इतका वाईट आहे कि तू इतकी चिडलीस आणि इथे माझ्यासाठी येण्यास नकार पण दिलास. मग अशी कशी उगवलीस?"
"तू गप्प बैस आता. मी येणार नाही असं कस होईल. बर हे घे तुझ्यासाठी आणलंय." 
आदित्य फुल घेतो. "thanks ".
पुरस्कार सोहळा संपताच दोघे सोबतच निघतात.
"खर तर आज सेलिब्रेशन पाहिजे. चल आपण पाणीपुरी खावूयात. "
"ओ बाईसाहेब, तुमच्या दहाव्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला तरी पार्टी दिली नव्हती तुम्ही आणि आता माझ्या पहिल्याच पुस्तकाला पुरस्कार मिळाला आर लग्गेच त्या पुस्तकच क्रेडीट पण तुम्हालाच आणि वरून पार्टी पण तुम्हालाच. हे चांगल आहे."
"खरच .. मला खर वाटत नाहीये. त्यादिवशी आपण पावसात भेटलो नसतो आणि तुला त्या दिवशी एखादा जोब भेटला असता तर आपण असे भेटत राहिलो नसतो. ना मी माझी पुस्तक लिहायची हौस पुढे नेली नसती ना आज माझे इतके सारे पुस्तक प्रकाशित झाले असते." जान्हवी एकदम भूतकाळात मग्न होते...
तेवढ्यात आदित्य तिची तंद्री तोडत म्हणतो,"आणि ना आज माझ्या कवितेच्या नायिकेला घेवून मी इथे पाणीपुरी खाल्ली नसती."
"खरच जानु , तुला पाहिलं ना कि मला कविता सुचू लागते. हे अगदी पहिल्यापासूनच आहे पण मला खूप उशिरा कळलं कि माझ्या कवितेचा उगम तुझ्यामध्ये आहे ते. खरच माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर. "
"खूप म्हणजे किती?"
"खूप म्हणजे ... म्हणजे २५ किलो. २५००००० किलो.. "
दोघेही हसू लागतात.
"ए आपण आभाला खूप दिवसात भेटलो नाही बघ. या सुट्टीच्या दिवशी आपण पक्का भेटूयात हं."
"अगं आत्ताच नाही जमायचं, आता माझी परीक्षा पण आहे दोन आठवड्यावर. असं करूयात माझी परीक्षा झाली कि आपण सर्वांनाच भेटूयात. छान प्लान करू. अगस्तीपण येतोय दीड वर्षानंतर ओस्ट्रेलिया तून. आपण संजूला फोने करून बोलवून घेवू. श्रेयू तर आहेच इथे. ती येईल. आभाशी तू बोलून घे ."
"ओके ."
.......
"हेलो, काकू आभा आहे का? "
"अग ती बाहेर गेलीये. तू ?"
"काकू मी जान्हवी बोलतेय. आभाला सांगा या रविवारी सर्वांनी भेटायचा प्लान केलाय ते. आणि तिला फोन पण करायला सांगा."
"ठीक आहे. सांगेन तिला. ठेवते."

"हेलो .."
"बोला जान्हवी madam , मग फिक्स झाला का वेन्यु? कुठे जमायचं ?"
"अग हो हो... तू तर लगेच सुरु होतेस. श्रेयू मला सांग तुला रविवारी तर सुट्टी असतेच, पण यावेळी सोमवारी-मंगळवारी पण सुट्टी घे. ३ दिवस आपण धम्माल करणार आहोत. संजू बाबा आलाय कालच."
"काय्य्य .. संज्या आला? आणि मला सल्याने एकपण फोन नाही केला. चंपक. थांब मी त्याला फोन लावते."
"अग अग, चिडू नकोस. त्याच्या आई पप्पा सोबत तो मुलगी पाहायला जाणार होता आज. म्हणून त्याने तुला फोन केला नसेल ग. आणि त्याच आणि माझ पण बोलन नाही झालाय. ते तर मी त्याच्या फेसबुक वर स्टेटस पाहिलं. म्हणून सगतीये. आणि मुलगी पाहायचं मला आदित्य बोलला. कदाचित आदीच आणि त्याच बोलन झालाय. चिल. तो भेटणारे ना तेव्हा त्याची खेच हवी तेवढी."
"हो तुला बर इतका पुळका आलाय त्या संजूचा. पण वेट वेट ... संजय कर्वा आणि मुलगी पाहायला ?? अरेरे अडकला बिचारा. हा हा हा हा."
"तू हसू नकोस. हे मारवाडी लोकांमध्ये मुलगा-मुलगी भेद नाही करत. दोघांची लग्न लवकर करून टाकतात. हे हे. पण खरच संजू अडकला बिचारा. "
"ए जानु, बर तुझ आणि आभाच बोलन झाल का? ती येतीये ना ? "
"हो. म्हणजे आधी तिच्या मम्मी सोबत झाल होत बोलन पण नंतर तिने फोन केला होता. तीपण येतीये."
"आभा तर एकदम हिरोईन झाली आता. तीच काय बाबा.."
"श्रेयू , बस झाल बर का आता. किती खेचनारेस सर्वांची. बर चल मी ठेवते फोन नाहीतर तू काही थांबणार नाहीस. "

गुरुवारी सकाळी अगस्ती ओस्ट्रेलिया तून निघतो ते शुक्रवारी पोचतो. शनिवारी संध्याकाळी सर्व जन दिवे आगार ला जायला निघतात. सुमो मध्ये नुसता सर्वांचा धिंगाणा चाललेला असतो. आदी आणि अगस्ती दोघ सुरात सूर मिळवून संजूच्या मुलगी पहायच्या प्रोग्राम ची बातमी विस्तृत पाने सर्वांसमोर मांडत असतात. आणि बाकी सर्व त्याला चिडवण्यात कमी सोडत नसतात. ३ दिवस भरपूर मज्जा करून सर्व जन परत येतात.
अगस्तीच पी.एच.डी. च सबमिशन झालेलं असत. त्यामुळे त्याला आता रिझल्ट ची वाट पाहण्यात दिवस घालवायचे असतात. बाकी आभा आपल्या शुटींग मध्ये बिझी होवून जाते. जान्हवी पण तिच्या जॉब, प्रोजेक्ट आणि पुस्तक लेखनामध्ये. संजू दिल्ली ला निघून जातो. श्रेयू मात्र बर्यापैकी रिकामी असते. ऑफिस सुटल कि ती, अगस्ती, आणि आदित्य भटकत असतात. 

आदित्यचा पण रिझल्ट लागतो, तो यावेळी सी.ए. च्या सर्व परीक्षा पास होतो.  आणि त्याला मोठ्या कंपनीतून ऑफर येते. तो तिथे जॉईन होतो तसा श्रेयू आणि अगस्तीच भटकायला उरतात.