Sunday, September 18, 2011

काजव्यांच्या प्रकाशात - १

खिडकीतून बाहेर दूरवर काळा आसमंत पसरला होता. खिडकीच्या कोनाड्यातल्या फटीतून थंड वारा सुर्र्रकन आत येवून चादारीमध्ये घुसत होता. रडून रडून लाल झालेले तिचे डोळे सुजल्यामुळे अजूनच दुखी वाटत होते. माझ्या सोबतच असं का, असं प्रश्न ती विचारू शकत नव्हती त्या देवाला, कारण आज पर्यंत देवाने जे दिले होते ते सर्वच भरभरून  दिले होते. तरीही तिची ओंजळ रिकामीच होती. त्या काळ्या आसमंताकडे पाहताना तिला अजून कसस झाल. चार चांदण्या कुठेतरी टीमकत होत्या, त्यासुद्धा विखुरलेल्याच होत्या.  ज्याला आपण दैवाच्या हाताचे खेळणे आहोत आणि जसे आपल्यासोबत होते तसेच किंबहुना अजूनच जास्त वाईट होत असेल याची जाणीव असते, अश्यांना आपल्यासोबतच असे का हा प्रश्न विचारून दुख करण्याची मुभाही नसते. तीसुद्धा हतबल झाल्यासारखी अशीच स्वताशीच विचार करत होती. 
'काय झालं? दुसऱ्यांच्या हातामध्ये आपल्या आयुष्याचे निर्णय जेव्हा आपण देतो, तेव्हा असच होणार ना. दुसऱ्यांना कसं कळणार कि आपला आनंद कशामध्ये आहे आणि जरी कळलं तरीही त्यांना त्या आनंदाची किमत कशी असणार. त्यांच्या लेखी कदाचित आनंदाची परिभाषाच वेगळी असेल. आजवर जे जे ठरवलं ते ते असच वाहवत गेल. खूप काही करायचं
राहून गेलं. लहानपणीच उलट मी दुसऱ्यासाठी जगत गेले. नाही वळवता आली लोकांची मन आपल्याला जे हव ते करून घेण्यासाठी. किवा कदाचित स्वताला इतरान्सारख जिद्दी म्हणून घेतलेलं आवडलं नसत म्हणूनही कशाचा अट्टहास केला नसावा. पण त्या होड्या पाण्यात सोडायचं राहून गेल्या ते गेल्याच. आता ते पावसाच पाणी इवल्या हातांसाठी थोडी ना थांबणार होत. आणि खर तर आता ते हातही इवले कुठे आहेत. हल्ली म्हणूनच कि काय प्रेम बीम असल्या गोष्टींवर विश्वास बसवत नाहीये. आयुष्य म्हणजे  फक्त आणि फक्त संघर्ष असतो. एका समूहाचा दुसऱ्या समूहाची, एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी, एका पेशीचा दुसऱ्या पेशीशी. बाकी सर्व झुठ. नश्वर आहे हे आयुष्य. इथे प्रत्येक क्षण हा दुसऱ्या क्षणाला मारून उभा राहतो. कत्तल केल्याशिवाय इथे कोणाचा जन्मच होत नाही. आणि हे सर्व कळत असतानाही या आयुष्यातल्या पराभवाची तीव्रता कमी होत नाही. कारण परिस्थितीसोबत आपण पटकन सावरू शकत नाहीत.'
थोडा वेळ तिचे डोकेसुद्धा विचार करून सुन्न झाले, तिचे डोळे लागतच होते तेवढ्यात कशामुळे तरी तिला जाग आली. खर तर तिला झोपायाचेच नव्हते, ती कसोशीने प्रयत्न करून स्वताला जागे ठेवण्याचा आणि गुंता सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. परत मागे सोडलेल्या विचारांच्या पाठी लागून तिला त्यातून काहीतरी मार्ग काढायचा होता. असा मार्ग जो तिच्यासाठी आनंद घेवून येणारा असेल. खर तर तिलाही हे खूप चांगल माहिती होत कि कितीही प्रयत्न केला तरी ती स्वताच्या आनंदासाठी दुसऱ्याला दुख देवू शकणार नाही, आणि जो आनंदाचा मार्ग ती शोधात आहे ते फक्त एक मृगजळ आहे. मृगजळ नेहमी दुरूनच आनंद देणार असतं. तिला क्षणभर वाटल कि देव बोलत असता तर त्याने काय बरोबर आणि काय चूक हे तरी सांगितलं असतं ना. पण परत तिच्या समजूतदार मनाने तिला समजावलं - कि चूक बरोबर हे आपल्या मनाला खूप चांगल माहिती असतं, आपण फक्त त्यावर पडदा पडून बसलेलो असतो. कारण एकतर जे बरोबर आहे ते आपल्या आवाक्यातला नसतं, म्हणजे जे बरोबर आहे ते करण्याची आपल्यामध्ये हिम्मत नसते किवा जे बरोबर आहे ते आपल्याला दुख देणार असतं. म्हणून आपण त्यावरचा पडदा उचलायचा धीरच करत नाहीत. तिची खरी अडचण हीच होती कि तिला सर्व परिस्थितीची जाणीव होती, तिचा त्रागा हा निरर्थक आहे याची तिला जाणीव होती. आणि त्याने कोणाला काही फरक पडणार नाही हेसुद्धा तिला खूप चांगले माहिती होते. आणि त्रास जर कोणाला होणार असेल तर तो फक्त तिला स्वताला - कारण ती आधीपासूनच स्वताची स्वप्न मारून जगात होती. तो धुमसणारा ज्वाला कधी ना कधी उसळणार हे तिला खूप चांगले माहिती होते. आणि ज्वालामुखी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा स्वतासोबत तो आजूबाजूचे जगही उध्वस्त करतो.तिला स्वतचे उध्वस्त होणे मान्य होते पण आजूबाजूंच्या लोकांचे त्यात होरपळणे मान्य होत नव्हते. पण नैसर्गिक आपत्तीवर आपलाही काही काबू नसतो. ती तरी काय करणार होती.
आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्यासाठी आधी राख तर तिला व्हावेच लागणार होते. आणि हि तिच्या पुढच्या विजयाची खरी वाटचाल सुरु झाली होती. आज तिची रात्र काळी होती पण उद्या तोच आसमंत ती तिच्या प्रकाशाने उजळवून टाकणार होती. कदाचित त्या लखलखत्या प्रकाशाचा सामना करायला जास्त हिम्मत लागणार होती तिला.


Friday, September 16, 2011

याला जीवन ऐसे नाव... (उत्तरार्ध २)


नवीन शूज आणि नवीन लूझर घालून मी तयार होते जॉगिंग ला जायला. माझ्या साठी ते जॉगिंग कमी आणि फोटोग्राफी जास्त असाच होत. कानामध्ये मस्त हेडफोन घालून माझी समुद्राकाठची फेर चालू वयाची, त्यामध्ये मिसळायचा लाटांचा आवाज. मलाही माहिती होत कि, हे फक्त नव्याचे नऊ दिवस होणारे, कोणतीही गोष्ट परत परत करताना मला येणारा कंटाळा फार महागात पडायचा, पण चला जोपर्यंत शूज नवीन आहेत तोपर्यंत तरी  चिंता नव्हती कंटाळ्याची ! यावेळी हे नव्याचे  नऊ दिवस २ महिने टिकले होते. जवळ जवळ २ महिने न चुकता जॉगिंग केली.
तो दिवस सुद्धा असाच होता, नेहमीसारखाच. मीही नेहमीसारखीच निघाले कानामध्ये काड्या घालून. किनाऱ्यावरती फुटपाथ केला होता, त्याच्या कडेकडेने मी निघाले, थोडा वेळातच हेडफोन चा कंटाळा आला. खरतर तीच तीच गाणी रोज ऐकून कंटाळा आला होता किवा बहुतेक लाटांचा नाद त्या गाण्यापेक्षाही मधुर वाटत होता कानाला. शेवटी ते निसर्गाचे संगीत. पाऊन तासामध्ये एक फेरी मारून परत आले. संध्याकाळ झाली होतीच एव्हाना. आणि आकाशामध्ये सूर्य लाल रंग फेकून पळून जायच्या तयारीमध्ये होता. नंतर रात्र येवून त्याचा लाल रंग सावडून, काळा रंग पसरवणार होती, तिच्या लाडक्या चंद्रासाठी.
तेवढ्यात ते दोघे दिसले, त्यांची काठी त्या पुतळ्याला शोधात होती. त्याच्या एका हातात काठी होती आणि दुसऱ्या हातामध्ये तिचा सुरकुतलेला हात. तिच्या दुसऱ्या हातामध्ये एक पिशवी होती. त्या दोघांच्या चेहऱ्यावर सुद्धा सूर्य रंग फेकत होता, त्यामुळे दोघांचा आधीच गुलाबी असलेला चेहरा अजून तेजपुंज वाटत होता. मी आपली लांबूनच पाहत होते. ते तिथेच गोल गोल फिरत होते, पण तो पुतळा काही त्यांना सापडेना किवा त्याच्या हातामध्ये असलेल्या त्या यंत्रामधून सुद्धा पुतळ्याची दिशा सांगणारा आवाज येईना. कदाचित त्याची चार्जिंग संपली असेल. तेवढ्यात कोणीतरी तिथे आले आणि त्यांना विचारले कि काही मदत हवी आहे का म्हणून. त्यांनी पुतळ्याबद्दल विचारलं. पुतळा तर तिथेच होता, पण त्यांना समजल नाही कि तो तिथेच आहे म्हणून. काठीने चाचपत चाचपत ते पुतळ्याच्या चबुतऱ्या पर्यंत आले. तो तिथे उभा राहिला, तिने लगेच पिशवीतून तिची काठी काढली चाचपत चाचपत थोडीशी लांब गेली, पिशवीतून कॅमेरा काढला. अंदाजानेच चेहऱ्यासमोर पकडला, कि त्या कॅमेऱ्यातून कसलातरी अवाज आला. कि लगेच त्याच्या चेहऱ्यावर मोठ हसू झळकल आणि तिने कॅमेऱ्याच बटन दाबलं. फ्लाश पडला आणि फोटो निघाला.
मी मात्र अवाक होवून बघतच राहिले. त्यांना दृष्टी नाहीये हे समजायला मला २ मिनिटे लागली.
त्यांना दृष्टी जरी नसली तरी नजर दिली होती देवाने! जगण्याची, जगणं शिकवण्याची !
एव्हाना सूर्य रंग उधळून निघून गेला होता. पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर तोच सूर्य चमकत होता.

                                        (हा तोच पुतळा आहे, पण मला त्या दोघांचा फोटो घेता नाही आला.)


Wednesday, September 14, 2011

याला जीवन ऐसे नाव.. (उत्तररार्ध)


रंगे बे रंगी  आयुष्याची  सकाळ  सौम्य  लाल  रंगाने  होते,  मग  प्रखर  पिवळा  आणि  मग  सौम्य  केशरी - निळा -जांभळा  आणि  
मग  काळा  कुट्ट  आणि  परत  स्वछ  पांढरा.
सदफुलीला  पाच  पाकळ्या , आपल्या  हाताला  पाच  बोट , पांडवही  पाचच  आणि  आयुष्याचे  भागही  पाचच  - 
पहिला  लहानपणीचा ; रांगण्याचा  - पडण्याचा - उठण्याचा - चालण्याचा - पळायचा आणि  परत जोरात  पळत  जाताना  पडण्याचा .
दुसरा  भाग  कळतेपणाचा ; शाळेत  जायचा - अभ्यास  करण्याचा - मनसोक्त  आई   ओरडू पर्यंत खेळण्याचा - बाल्कनी तून  उडी  मारून  गुपचूप  बाहेर  जाण्याचा -संध्याकाळी  शुभम करोति म्हणण्याचा - शनिवारी  आणि  रविवारी  उशिरापर्यंत  दूरदर्शन  चे  पिक्चर बघण्याचा - स्कॉलर शिप ,elementary intermediate,MTS च्या  परीक्षा  देण्याचा - खूप  खूप  खेळण्याचा. 

तिसरा  भाग  - मऊ  मऊ  लसलशीत  तरुणाईचा  - पावसात  नाचण्याचा , फुलपाखरामागे  उडण्याचा , हवेसोबत  धावण्याचा   -  कॉलेज मध्ये  बँक करण्याचा  आणि  हुंदडण्याचा  - आकांक्षा , जगण्याची  तत्व , माझी  मत , माझी  जागा , माझी  किंमत ; या  सर्व  गोष्टी  शोधण्याचा  - थोडी  हुल्लडबाजी  करण्याचा  - चोरून  प्रेम  करण्याचा  - दोस्तीचे  वायदे  करण्याचा  - भुतांच्या  गोष्टी  सांगायचा - प्लांचीट  करण्याचा  - PL मध्ये  खूप  अभ्यास  आणि  लॉन  मध्ये  जावून  गोंधळ  घालण्याचा  - आपसूक  जॉब  साठी  स्ट्रगल  करण्याच्या  तयारीचा  - जॉब  करण्याचा  - उंच  उंच  शिखर  गाठण्याचा  - बोटांमध्ये  बोटे  अडकवून  हातात  हात  घालून  कोणाच्यातरी  मंद  स्मितामध्ये  बुडण्याचा   - हळुवार  पणे  कोणाला  तरी  आपले  अर्धे  आयुष्य  देण्याचा  आणि  त्या  कोणालातरी  आपला  जीवांसाठी  बनवण्याचा  - खूप  खूप  गप्पांचा  
चौथा भाग  आपल्या  मुलांचा  - देत  देत  राहण्याचा  - दुडू  दुडू  धावणाऱ्या  पावालान्च्यामागे  आपली  मोडकी पावले  शोधण्याचा  - त्यांच्या  परीक्षेचा , आणि  आपल्यासुद्धा   - त्यांच्या  कलाकलाने  वाढणाऱ्या  गुणांचा  आणि  अवगुणांचा  - आपल्या  मुलाला  बघून  आई  ला  आठवण्याचा   - खूप  खूप  समजून  घेण्याचा 

पाचवा  आणि  शेवटचा  भाग  - फक्त  आणि  फक्त  जाणीवेचा  - शेवटच्या  स्टेशनाकडे  निघण्याचा - राहिलेलं , उरलेलं  सुरलेल  मीचमीच्या  डोळ्यांना  दिसेल  तेवढे  पहात  राहण्याचा  - ऐकू  न  येताही  ऐकण्याचा  - तोच  खरा  काल  सर्व  आयुष्य  उमगण्याचा  - आणि  सर्व  सोडून  निघून  जायचा.

पहिल्या  भागात  फक्त  घेणे  घेणे  घेणे 
दुसऱ्या भागात  शिकणे  शिकणे  शिकणे 
तिसऱ्या भागात  देणे  देणे  देणे 
चौथ्या  भागात  शिकवणे  शिकवणे  शिकवणे 
पाचव्या  भागात  सर्व  देण्याघेण्याचा , शिकण्या - शिकवण्याचा  हिशोब  मांडणे .

काळ्या  रात्रीच्या  अंधारात  जेवा  आपण  चाचपडत  असतो , आपल्याला  वाटते  दिसत  नाहीये  तर  चष्मा  लावून  बघू  मग  आपण  
चष्मा  लावतो  तरीही  दिसत  नाही  मग  वाटत  आपला  नशीबच  खोट. आपल्याला  काहीच  मिळत  नाही . आणि  थकून  आपण  झोपून  जातो  किवा  आपले  डोळे  मिटून  घेतो  आणि  ती  असते  दिवसाची  शेवटची  प्रहर. आपण  गाढ  झोपेत  असतो  आणि  सकाळ  होते. आनंदाची - प्रकाशाची. पण  आपण  डोळे  मिटलेले  असतात  आपल्याला  तो  प्रकाश  दिसतच  नाही . मग  दुपार  होते . आणि  आपण  डोळे  उघडतो . प्रखर  प्रकाशाने  डोळे  दिपून  जातात , उठेपर्यंत  उशीर  झालेला  असतो  म्हणून  आपण  वैतागतो . आता  हे   करू  कि  ते  करू  कळत  नाही . सर्व  कामं  अर्धी  अर्धी  करून  टाकतो . मग  आपल्याला  वाटत  आपण  थकलो  जरा  विश्रांती  घेवू , तेव्हा   
संध्याकाळची  चाहूल  लागते . क्षण  दोन  क्षण  विश्रांती  घेवून  आपण  परत  कामाला  सुरुवात  करतो. आपली  गाडी  जरा  रुळावर  यायला  लागते  न  लागते  तोच रात्र  व्हायला  चालू  होते . गडबडीत  गडबडीत  आपण  कामं  करायची  ठरवतो , पण  अंधार  होतोच . आणि  परत  सकाळची  वाट  न  बघता  आपल्याला  दिसत  नाही  वाटून  आपण  चष्मा  शोधायला  फिरतो. आणि  चक्र  पुन्हा  सुरु  होते. अंधाराचे  आणि  प्रकाशाचे. 
प्रत्येकाला  आपल्या  समोरचा  डोंगर  मोठा  वाटतो , आणि  शिखरावर  पोचायची  वाट  खूप  अडचणीची  आणि  जंगलातून  जाणारी  वाटते. पण  त्या  झाडीतून  जाताना  बागडणारी  फुलपाखर, दिसणारे मोर, घाबरवणारे वाघ - सिंह , वाचवणारा  शिकारी , जंगली  सुंदर  फुले  हे  सर्व  आहे  याचा  विचारच  करत  नाही  आपण. मला  नेहमी  वाटायचं  कि  मी  जे  भोगते  आहे - ते  कोणीच  भोगले  नसेल. पण  खर  तर  तेच  होत  मी  जे  भोगले  ते  कोणी  कसे  भोगेल  - बाकीचे  त्यांचे  त्यांचे  भोग  भोगतील  न , माझे  भोग  का  भोगतील. आणि  खर  तर  शिखरावर  पोचाण्यापेक्षा तिथपर्यंत  जाण्याचा  आनंद  मोठा आहे.
आणि  प्रत्येकाला  मोठा  वाटेल  असाच  डोंगर  मिळतो.



Friday, September 9, 2011

लिचकुर


आता सर्वच बदललं आहे तिथलं, पण वाड्यासमोर आता सिमेंट चा रस्ता तयार केला आहे, अगदी वाड्यामध्ये सुद्धा नवीन विटांची भिंत आली आहे. आता सकाळी सकाळी वारा एकदम घरात घुसून चादरीतून उठवत नाही. आता वाऱ्याला चार भिंती ओलांडून तिथवर याव लागतं. वाड्याचे वैभव हे नवीनपणात नसून जुनेपणात जास्ती आहे हे आत्ता कळतंय. आता मामाही नाहीये आणि मामाचा वाडाही आता आधीसारखं नाहीये. नवेपणामध्ये तो वाडा आता पूर्ण झाकोळून गेला आहे. पण थोड्याश्याच का असेनात त्याच्या आठवणी चं आहेत. प्रत्येकाला आपल्या आजोळच्या आठवणी भरभरून मिळतात. लाड करणारी आजी असते. गोष्टी सांगणारे, फिरवणारे, भजनाला घेवून जाणारे आजोबा असतात. 
पण या सर्वातूनही मला तो वाडा फार आठवतो.
सकाळी सहा ला मला अलगद जाग यायची ती तिथेच. सकाळचा थंड गार हिरवा वारा थेट चादारीमध्ये घुसून उठवायचा. पाणी भरणारे, सकाळ सकाळ शेतावर जाणारे, सकाळच्या सारवनाचा वास, वाड्यातच असणारा गोठा, वासराचे सकाळी सकाळी हंबरणे. या सर्वांमुळे सकाळीच जाग यायची. थंड काळ्या दगडावर राखेने तासान तास दात चोळत बसने. मग मामी येणार सडा घालणार. रांगोळी काढताना मी थोडीशी लुडबुड करणार. मी रंग भरणार म्हणून मागे लागणार. आणि आई मात्र माहेरी आल्याचा आनंद लुटत अजूनही साखरझोपेमधे असणार. 
शेतात जायचं तसं खूप वेड होत मला, अजूनही आहे. पण खरच इतका शुद्ध निसर्ग मी दुसरीकडे पहिला नाही. खरी खुरी जमीन आणि खरं खुरं आकाश तिथेच पाहायला मिळणार. 
तिथेच एका सुट्टीमध्ये मी गोष्टीच पुस्तक वाचलं होत. त्यामध्ये एका लिचकुर पक्षाची गोष्ट होती. तो पक्षी जादूचा होता, आणि तो सर्वांची इच्छा पूर्ण करत असे. गोष्टीमधल्या गरीब मुलीचा तो मित्र होता आणि तिला त्याच्याकडून कोणतीही इच्छा पूर्ण नसते करायची तर तिला त्या पक्षाची अखंड सोबत हवी असते - गप्पा मारायला. गोष्टीमध्ये त्या पक्षच वर्णन केल होत. झालं, मग आपल्याला काम काय आहे ना. रोज सकाळ दुपार संध्याकाळ त्या पक्षाचा शोध सुरु झाला. वाड्यासमोर एक मोठ अंगण होत, अंगणात हापसा होता. पण हापसा कधीतरीच चालू असायचा, बाकी वेळेला तर आम्ही त्याचा उपयोग लोखंड-पाणी खेळायला करायचो. अंगण संपले कि पुढे एक भली मोठी भिंत होती. उंचच उंच. ती दुसऱ्या वाड्याची मागची बाजू होती आणि तो गढीचा वाडा होता म्हणून ती भिंत खूपच उंच होती. त्या भिंतीमाढल्या दगडांच्या खोपच्यात भरपूर पक्षाची रहायची जागा होती. असंख्य चिमण्या, साळुंख्या तिथे ठाण मांडून असायच्या. एके दिवशी मला तिथे नवीन पक्षी दिसला. हिरव्या रंगाची झाक असलेला, थोडासा निळसर, करड्या  रंगाचा, डोक्याचा भाग अगदी मुखवटे रंगवल्यासारखा फिकट केशरी आणि शेपटी लांब, तिरकी थोडीशी उभात चातसा पिसारा असल्यासारखी. दुसऱ्या दिवशी तिथे अजून एक तसाच पक्षी दिसला. नंतर हळू हळू कळाल कि हे पक्षी तर इथे खूप आहेत पण त्याचं घर त्या दगडांच्या खोपच्यात नसून पलीकडच्या पडीक वाडातल्या झाडावर आहे. मग रोज त्याचं निरीक्षण सुरु झालं. या पक्षामध्ये आणि गोष्टीमधल्या पक्षामध्ये भरपूर साम्य होत. साम्य काय होत, ते दोन्ही एकाच पक्षी होत. आणि मला माझा लिचकुर पक्षी सापडला. मी सर्वाना रोज सकाळी तो पक्षी दाखवायचे आणि मनामध्ये इच्छा पकडायला सांगायचे, आणि सर्व मला हसायचे. कि लिचकुर पक्षी हा फक्त गोष्टीमध्येच असतो. पण माझा ठाम विश्वास होता कि जरी या पक्षाने माझ्या इच्छा पूर्ण नाही केल्या तरी देखील हाच तो लिचकुर पक्षी आहे. 
त्या लिचकुर पक्षाकडे त्यावेळी मी अगणित इच्छा मागितल्या असतील - अगदी वर्गामध्ये मोनीटर होणार का पासून ते मी पायलट होईल का, चौथी स्कॉलरशिप मध्ये नंबर येणार का पासून ते उद्या गुलाबजामून खायला मिळणार का पर्यंत, मोठेपणी देशासाठी मरायची संधी मिळेल का पासून ते लसावी आणि मसावी काढण्यात पक्की होणार का पर्यंत अगदी खूप काही विचारलं असेल.
परवाच टीव्ही वरती एक कार्यक्रम लागला होता - शिंपी पक्षाबद्दल माहिती देत होते. तो कार्यक्रम खरतर जगामधल्या सुंदर बांधकामावर होता. आणि त्यामध्ये शिंपी पक्षाचे घरटे पण होते. शिंपी पक्षी त्याचे घरट वीणन्या साठी प्रसिद्ध आहे. निसर्गतः या पक्षामध्ये हि कला कशी अवगत आहे हा खरच एक संशोधनाचा विषय आहे. कार्यक्रमाच्या शेवटी त्या पक्षाच्या नावांची यादी दिली होती. 

 टेलर बर्ड (Tailor Bird ), वैद्यानिक भाषेत Orthotomus sutorius, गाणारा पक्षी (Singing  Bird ), शिंपी, विणकर आणि "लिचकुर". 





Monday, September 5, 2011

आम्ही शब्दाचे सोबती

आम्ही नाही गिर्यारोहक तरीही चढतो पर्वत एका उडीत,
आम्ही नाही सुरेल गायक तरी गातो गाणे एका दमात,
आम्ही नाही जरीही माळी, तरीही बाग आमची सदाफुली,
आम्ही नाही जरी सुगरण तरीही सुग्रास आमची थाळी,
आम्ही नाही जरी कामसू तरी हात आमचे नेहमी तयार,
आम्ही नाही जरी भित्री भागू तरीही घाबरतो सावल्यांस,
आम्ही नाही जरी कोणी शिक्षक तरी शिकवतो आयुष्याचे धडे,
आम्ही नाही जरी कुठला नायक तरीही पात्र आमचे खरे खुरे..
आम्ही नाही जरी दूरदर्शी तरी नजर आमची काजव्यावारती,
आम्ही नाही प्रवासी देशोदेशीचे तरी ओळख साऱ्या प्रांताची..
आम्ही गेलो नाही कुठे जरी मन आमचे न जागेवारती,
आम्ही असलो कुठल्याहि जमिनीवरती तरी इच्छा आकाशाच्या वरती..
आम्ही असो कुठेही, कोणासोबत, स्वप्न आमचे सदा  भिरभिरती.. 
आम्ही शब्दाचे सोबती, शब्दच विकतो आणि शब्दच खातो..
शब्दाचे मनोरे रचतो, शब्दांसोबत वाहतो, शब्दांना वाहवतो...
हे शब्दच नेती दर्यावरती, आकाशाशी भेट घडविती,
हिमालयाशी साद घालिती,
अन आम्हा भुलविती..
आम्ही नाही कवी, नाही लेखक, नाही कोणी साहित्यिक,
आम्ही शब्दांचे सोबती, शब्द आम्हा पारखती, आणि शब्दांशीच आमच्या ओळखी...