१० मे १८५७, ब्रिटीश सेनेमध्ये काम करणाऱ्या भारतीयांमध्ये असंतोष पसरला आणि ठिणगी पेटली. त्या एका शिपायाने लावलेल्या ठिणगीमुळे हजारो लोक पेटले आणि तो उठाव झाला. प्लासी मध्ये झालेला पराभव आणि मग हळू हळू रक्तामध्ये पेरली गेलेली क्रांती मोठी होवून जंग पुकारायला त्यानंतर १०० वर्षे लागली. कोणतीही गोष्ट एका रात्रीमध्ये होत नाही. त्यासाठी हजारो रात्री काजव्यांच्या प्रकाशात धुमसत राहाव्या लागतात. आणि कोणतीही राक्षसी शक्ती समूळ नष्ट करण्यसाठी, राक्षसाच्या राज्यामध्ये घुसावे लागते. रामालाही नाही का लंकेपर्यंत जावे लागले. लंके पर्यंत जातानाही बराच खडतर प्रवास झाला होता आणि तिथे जावून जंगी झुंज पेटली होती. तीसुद्धा त्या खडतर प्रवासा इतकीच कठीण होती.अखेर विजय झाला, तो केवळ रामाच्या देव असण्यामुळे नाही किवा त्याच्या अपार शक्तीमुळे नाही तर अगदी छोट्या छोट्या जीवांच्या त्या लढाई मधल्या सहभागामुळे. तिथे केवळ राम नव्हता. तिथे संपूर्ण वानरसेना, सुग्रीव, लक्ष्मण, हनुमान, विभीषण, आणि अगदी छोटी खारू ताई सुद्धा होती. जेव्हा सर्वात छोट्या पातळीपर्यंत क्रांती जावून पोचते तेव्हा तिथून पुढे फक्त आणि फक्त विजय असतो. एका माणुसकीचा, एका चांगुलपणाचा, स्वातंत्र्याचा आणि एका वैभवशाली भविष्याचा विजय सुरु होतो. पण तिथवर जाण्यासाठी सहनशक्ती, सातत्यता, निष्ठा, आणि झोकून देणे हे सर्व करावे लागते. लंकेच युद्ध जिंकायला फक्त राम कधीच पुरला नसता, म्हणूनच तर बाकीच्या लोकांचा सहभाग होता. आणि कदाचित रामापेक्षाशी बाकीच्यांचेच योगदान कणभर का असेना पण जास्त असेल.
सरदार वल्लभभाई पटेल, चाचा नेहरू, गांधीजी, लोकमान्य टिळक, लाल लजपत राय आणि त्यानंतर इंदिरा गांधी यांना सर्व सुधारणा करायच्या होत्या म्हणून त्यांनी बाहेरून टीका किवा लांबून हल्ले केले नाहीत. त्यानाही त्या राजकारण नावाच्या लंकेमध्ये उतरावच लागल होत. गटारामाधली घाण पूर्ण साफ करायची असेल तर त्यामध्ये उतरूनच ती साफ करता येते. फक्त सुरुवात कोणीतरी करून द्यावी लागते.
बरोब्बर १५४ वर्षानंतर हि ठिणगी परत एकदा पेटली आहे. परत एकदा देशामध्ये क्रांती व्हायला हवी आहे. आणि हि क्रांती फक्त बाहेरून मोर्चे, फेऱ्या काढून पूर्ण होणार नाहीये तर आज आपल्यामधल्याच लोकांना राजकारणामध्ये उतरून हि घाण साफ करावी लागणार आहे. कारण कितीही केले तरी आपण पिंजऱ्याच्या बाहेर थांबून सिंहाला आपल्या तालावर नाचवू शकत नाही. जर आपल्या राष्ट्राच्या उद्धारासाठी, प्रगतीसाठी, गोर गरिबांना पूर्ण सुविधा मिळाव्या यासाठी काहीतरी करायचं असेल तर आपल्यापैकीच कोणालातरी हा देश चालवायला घ्यावा लागणारे.
अण्णा हजारे - आजचा नवा गांधी ! हि ठिणगी पेटवण्याची कामगिरी अव्याहतपणे करत आहेत. आज देश फक्त भ्रष्टाचारामुळेच ग्रासलेला नाहीये तर बेजबाबदार नागरिकांमुळे - जे मतदान करत नाहीत, जे लाच देतात, जे पोलिसांमध्ये जावून तक्रार द्यायला घाबरतात, जे संकट स्वताच्या दारात असेल तरच त्याचा विचार करतात, अशा लोकांमुळेही ग्रासलेला आहे. म्हणजेच आता खारू ताई लाही या लढाई मध्ये उतरावं लागणार आहे. साधारण नागरिकालाही आपल्या हक्काची जाणीव हवी आणि नुसतीच जाणीव नको तर आपले हक्क हे प्रसंगी शस्त्रासारखे वापरायची धमकहि हवी आहे.
फक्त चार दोन चित्रपटांचे डायलॉग १०-१० वेळा बोलण्याशिवाय आपण काही करू शकत नाहीत का? नाही , आपल्यात ती शक्ती आहे आणि आपण ती वापरणार आहे. आणि किती जणांना मारतील हे राक्षस ? असेही कितीतरी जन बॉम्बस्फोटामध्ये मरत असतातच. कितीतरी गरीब जनता अन्नावाचून प्राण सोडते. मग जर आपल्या उद्याच्या पिढीसाठी आपण मेलो तर काय हरकत आहे ? आपल्या पूर्वजांनी, आपल्या आधीच्या पिढीने आपल्याला स्वतंत्र भारत दिला - कशासाठी ? त्याला पाश्चात्य संस्कृतीचे चुकीचे मार्ग अवलंबून खराब करण्यसाठी? कि देशातल्या प्रत्तेक नागरिकाला हर एक सुविधा बहाल करण्यासाठी ? कि जात-पात, उच्च निच्च यावरून वाद घालून दंगली करण्यासाठी ? कि कुठेतरी valentine day साजरा करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी आपण आपली शक्ती वापरणार आहे ?
हि क्रांती खर तर सामाजिक पातळीपर्यंतच सीमित नसून मानसिक पातळीपर्यंत गेली तरच कुठेतरी अमुलाग्र बदल होतील. आपली या देशाबद्दलची मानसिकताच आधी बदलली पाहिजे. जेव्हा आपण हा देश आपल घर माणू तेव्हा आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होईल.
पण हेही तितकाच खर आहे कि अजूनही आपल्या देशाचा आपल्याला अभिमान आहे, आदर आहे , गर्व आहे; असे अगणित लोक आहेत कि जे देशासाठी झटत आहेत, जे त्याग करून सीमेवर लढत आहेत, जे समाज कार्यामध्ये सहभागी होवून अनाथ-वृद्ध-अपंग लोकांसाठी काहीतरी मदत स्वछच मनाने करत आहेत, जे वर्तमान पत्रामध्ये कळकळीने मनापासून लिहून हि आग सतत जळत राहील यासाठी प्रयत्न करत आहेत, काहीजण देशासाठी अनेक क्षेत्रामध्ये प्रगती करून, नवनवीन संशोधन करून देशाची मान उंच नेत आहेत. आपल्या देशाचा आपल्याला अभिमान आहे, इतकाच नाही तर आपल्या झेंड्याचाही आपण खूप म्हणजे खूप आदर करतो. जेव्हा ब्रिटीश झेंडा त्यांच्या चपलीवर, शर्ट वर, टोपी वर , आणि इतकाच काय त्यांच्या अंतर्वस्त्रांवरही दिसतो तेव्हा वाटते आपण अजून खूप वरती आहोत. अजूनही आपल्या रक्तामध्ये आपल्या क्रांतिकारकांचे रक्त फिरत आहे. आणि म्हणूनच आपण एकमेकांना आवाहन करूयात - पुढे यायचे, भ्रष्टाचाराविरुद्ध फक्त आवाजच नाहीतर हातही उठवायचे, आपले हक्क बजावायचे. चला आता वेळ आली आहे रणांगणात उतरायची. तेव्हा रामायण झाले आता महाभारत होईल. रामायणामध्ये राम परकीय शत्रूंशी लढला, महाभारतामध्ये अर्जुन घरच्याच लोकांशी लढला. विजय हा नेहमी सत्याचाच होतो, आता आपल्याला आपल्या घरातल्याच लोकांशी लढायचे आहे.
पुन्हा एकदा क्रांती होवून जावूदेत.
भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।
जय हिंद !!