नारू एकदम दचकलाच. हडबडून तो उठून उभाच राहिला, त्याचा त्याच्या डोळ्यांवर क्षणभर विश्वासच बसेना. ती कसली तरी अवाढव्य व्यक्ती कि प्राणी कि अजून काही, जसं जमिनीवरून चालावं तसच अगदी उंच उंच ढांगा टाकत येत होत. हवेचा जोर वाढल्यामुळे ती अजब वस्तू नीटशी दिसतही नव्हती. नारू मात्र डोळे फाडून फाडून बघत होता. त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्याने स्वताच्या तोंडाचा वासही घेवून पहिला, कि आपल्याला चढली तर नाही ना, पण त्याने तर आज दारूचा एक घोटही घेतला नव्हता. त्याने वळून बाकीच्या मंडळीकडे एक कटाक्ष टाकला, ते पिऊन तर्रर झालेले आपल्याच गोंधळामध्ये मश्गुल होते. नारुला आता दरदरून घाम फुटला होता, त्याची हिम्मतच होत नव्हती परत समुद्राकडे पहायची, ती अगडबंब आकृती अजूनही तशीच ढंग टाकत पुढे पुढे येत होती. दीड माणूसभर उंचीची ती आकृती हेलकावत किनाऱ्याच्या दिशेने सरकत होती.
बगल्या, शोमन आणि जीरम्या सर्व जन त्या आकृतीकडे बघून मोठे मोठे आवाज काढून नाचत होती. वाऱ्याचा वेग अजून वाढला, किनाऱ्यावरच्या लाईट अचानक चालू बंद होवून झपाककन बंद झाल्या. किनाऱ्यावर फक्त अंधार अंधार पसरला. नाही म्हणता, रोडवरच्या गाड्यांच्या लाईटचा प्रकाश पडत होता. पौर्णिमेच्या आधीचे दोन दिवस, चंद्र बराच मोठा होता आणि त्याचा प्रकाश पण लक्ख पडला होता. पण अचानक कुठूनसे ढग आले अन चंद्रालाही झाकोळून टाकल.
नारूची बोबडीच वळली होती. त्याने डोळे गच्च मिटून घेतले आणि बगल्या, जीराम्या, शोमनच्या दिशेने अंदाजेच पाऊल टाकू लागला. तेवढयात ढगांचा कडकडाट झाला, जोरदार पाऊस सुरु झाला. इतक्या दिवसांचा जमिनीचा ताप शमवण्यासाठी हा पाऊस होता. मुंबई पावसामध्ये न्हावून निघत होती. नारुने डोळे उघडले, जोरदार पावसामध्ये आता हातभर अंतरावरच पण दिसत नव्हत. लाटा १० फुट उंचीवर उसळत होत्या. इतका वेळ पाण्यावर चालत येणारी ती आकृती आता हळू हळू स्पष्ट होऊ लागली. पण ती आता चालत नसून ती तरंगत होती. नारुला जीवात जीव आल्यासारख झाल. बगल्या आणि बाकीची मंडळी इतक्या वेळात त्या किनाऱ्यावर आडवी झाली होती. ती आकृती एक मूर्ती होती. ६-७ फुट उंचीची ती मूर्ती गणपती सारखी दिसत होती. पाण्यामध्ये असल्यामुळे थोडा रंग गेल्यासारखं झालेला. पण त्याची सोंड पूर्णपणे तुटलेली होती. खूप उशीर झाला होता, तांबड फुटायची वेळ जवळ आली होती. नारू ला थोडा वेळापूर्वी आपण काय काय विचार करून किती घाबरलो याच हसू येवू लागल. एव्हाना ती मूर्ती किनाऱ्याला लागली होती. त्या मूर्तीच्या जवळ जावून पाहू लागला. अगडबंब पोट, खुडलेले कान, तुटलेली सोंड, आणि दोन सुळे दात. नारुने हळूच त्या मुतीला स्पर्श केला आणि झर्रकन हात मागे घेतला, ती मूर्ती बर्फासारखी थंडगार होती. नारुला एकदम शीर शिरी भरून आली.
तो रात्रीच्या त्या प्रसंगामुळे थकून गेला होता, बगल्या च्या शेजारी जावून तोसुद्धा आडवा झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी सर्व मंडळी उठली आणि गप्पा करत बसली होती. नारू अजूनही झोपेतच होता. ती मूर्ती अजूनही तिथेच किनाऱ्याला पडली होती. किनारा पूर्णपणे सुकून गेला होता, रात्रीच्या पावसाचा कुठे मागमूसही नव्हता.
नारू, बगल्या, जीरम्या आणि शोमन नी मिळून ती मूर्ती जीरम्याच्या झोपडीमध्ये आणली. मूर्तीला साफ-सुफ केली. जेव्हा त्यांनी मूर्तीला पूर्ण साफ केल्यानंतर तीच निरीक्षण केल तेव्हा जीरम्याला असं वाटल कि त्या मूर्तीची सोंड तुटली नाहीये तर ती कधी बनवलीच नसावी. तसेच त्या मूर्तीचे कानही खुडल्यासारखे वाटत नसून ते मुळातच आखूड असावेत. जीरम्याच्या इतक्या वर्षांच्या नजरेत मोडक्या गणपतीच्या-देवीच्या मूर्ती बसल्यामुळे त्याला हे फरक पटकन जाणवले. पण तरीही त्याने जास्त विचार न करता त्या मूर्तीची डागडुजी सुरु केली.
पहिल्याच दिवशी नारू ने त्या मूर्तीला तासायला सुरुवात केली. पूर्ण मूर्ती तासून त्यावरचा एक ठार उतरवला आणि मग ब्रश ने मूर्ती साफ करून घेतली. मूर्तीच्या हाताचे काम करताना नारुला खरी माणकाची अंगठी सापडली. त्याने लगेच स्वताच्या बोटात अडकवली. बागुल आणि जीरम्या शाडूच्या मातीचे वेगवेगळे नमुने तपासून त्या मूर्तीशी सुसंगत शाडू शोधण्यासाठी बाजारामध्ये गेले होते. शोमन आपल्या बापाच्या - मेहमूदच्या - दारूच्या गुत्त्यावर बसला होता.
नारुने पूर्णपणे मूर्ती छान तासून ठेवली आणि तो त्याच्या मामाकडे जायला रवाना झाला. शेजारी त्याने निरोप ठेवले, कि तो मामाकडे जावून येतोय रात्री म्हणून.