Monday, January 2, 2012

चांदणं - ३



ती कशी नेहमीच अलगद अलगद, हवेवार स्वार असते,
झुळूके ची दोर तिच्या हाती दिलेली असते,
कदाचित म्हणूनच  वेडे मन हे उगाच त्या वादळात उडी मारू पाहते..
तिच्या मनाच्या तळाशी जावू बघते..
ती अशीच अलगद अलगद, हवेवर स्वार असते..
बाकी कशाशी तिचे घेणे देणे नसते,
उगाच जगणे तिला मान्य नसते,
ती हसते तेव्हाही पाण्यावरती तरंग उमटते..
ती अशीच येते आणि झुळूक बनुनी जाते,
एका क्षणाची तिची मिठी त्या हवेत विरघळून जाते ...
ती त्याच हवेवर स्वार होवून अलगद निघून जाते ...
स्पर्श हवेचा आजही तिची कहाणी वदतो,
ती होती हा भासही मजला हुलकावणी देवून जातो,
ती कमळ आणि मग शब्द माझा भुंगा बनून जातो,
तिच्या भोवती गिरकी घेवून लांबूनच परतू येतो,
ती आपल्या पाकळ्या मिटून मूक निरोप घेते,
मजसोबत त्या हवेलाही ती वेड लावून  जाते...
ती मात्र अलगद अलगद स्वप्नात विरून जाते ....

तिची कविता संपते आणि प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात बुजून जाते. त्या स्टेज वर जायच्या आधी आणि आत्ता कविता वाचून झाल्यावर तिच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास शिरला होता. तिच्या कवितेमधल्या नायिकेप्रमाणेच ती अलगद हवेवर स्वार झाली होती. आणि एक आकाशामध्ये उंच झेप घ्यायला सज्ज झाली होती. तो जल्लोष तिच्या रोमारोमामध्ये भरून उरत होता. टाळ्यांच्या त्या गजराला पूर्णविराम लागेपर्यंत तिने वाट पहिली. सगळीकडे शांत झाल्यावर तिने बोलायला चालू केल.

' मी, माझी मैत्रीण, माझी आई, माझी बहिण, मामी, अत्त्या, काकू, आजी, वाहिनी, शेजारची शालू, काकूंची माणिका, शाळेतल्या बाई, कॉलेजच्या टीचर - अशा कितीतरी रूपांमध्ये मी तिला पाहिलं आहे. माझ्या कवितेतल्या नायिकेला पाहिलं आहे. या सर्व जणींमध्ये आणि अशा अनेक जणींमध्ये अशीच एक परी लपलेली असते. जिला आयुष्य बेदरकार पणे जगायला आवडत. बेदरकार पणे म्हणजे उद्धटपणे नाही, किंवा उगाच फालतू नाही. हवेसोबत वाहत जाणं किंवा प्रवाहासोबत जाणं ज्याप्रमाणे असत त्याप्रमाणे.हे झाल कवितेच्या भाषेमध्ये. पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आपण हवेसोबत कसे वाहू शकतो ? तर, त्यासाठी एक किस्सा सांगते. आमच्या इथे एक काकू होत्या. त्या अगदी असाच आयुष्य जगायच्या. त्यांच्या आयुष्याचे किस्से त्या नेहमीच सांगायच्या आणि तेही हसत हसत - मग ते सुखाचे असो कि दुखाचे. तर त्या काकूंची आई त्यांच्या लहानपणीच त्यांना सोडून गेली होती. सोडून गेली होती म्हणजे मेली नव्हती, तर तिच्या बाबांना सोडून गेली होती. त्या म्हणायच्या कि त्या वेळी त्या शेवटच्या कळवळून रडल्या, पण व्हायचं तेच झाल. त्यांची आई काही परत आल्या नाहीत. वडिलांची लाडकी असल्यामुळे त्यांना काही कमी नव्हत, पण आई सोडून गेली याच अपराधीपण त्यांनी कधीच आपल्या वडिलांवर येवू दिल नाही कि स्वताही त्यात अडकून पडल्या नाहीत. पुढे शाळा कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणेच दंग मस्ती करून आनंद लुटला. मग लग्न झाले. नवरा एकदम शामळू मिळाला, त्या मात्र एकदम जॉली. पहिली एक - दोन वर्ष त्यांची संसार, नवरा करण्यात गेली. पण नंतर त्यांना काही ते जीवन रुचेना. त्यांना नेहमी वाटायचं कि नवऱ्यान सोबत करावी, त्यांना आवडणाऱ्या गोष्टीमध्ये साथ द्यावी. पण तास झाल नाही. तास त्यांनी स्वताला बदललं. एका ठिकाणी पार्ट टाइम नोकरी चालू केली. गल्लीतल्या गणपतीपासून त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची आयोजक म्हणून पाहण्यास सुरुवात केली, आणि आता त्या पूर्ण नगर पालिकेमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आयोजक आहेत. सोबत त्यांनी त्या वेळी गाण शिकायला चालू केल, मागच्या वर्षीच संगीताच्या सर्व परीक्षा पूर्ण पास झाल्या त्या. तबला, गिटार वाजवायला शिकल्या आणि एक-दोन कार्यक्रमामध्ये वाजवूनही झाल त्याचं. नवीन संगणक आले तेव्हा त्यांनी संगणकाच्याही परीक्षा दिल्या. आज त्यांच्याकडे त्यांचा स्वताचा नोटबुक आहे आणि त्या रोज वापरातातही. हे सर्व करताना त्यांनी त्यांच्या मुलानाही सोबत घेतलं. दोन मुलांसोबत त्यांनी कत्थक चे क्लास, गिटार चे क्लास केले. आज त्या ६५ वर्षांच्या आहेत त्यांना एका कार्यक्रमात विचारलं कि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप खुश कधी होता आणि कोणामुळे होता आणि तुमच्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देता ? त्याचं उत्तर अगदीच पटणार होत. त्या म्हणाल्या कि मी खुश माझ्या मनामुळे होते आणि जेव्हा झाले तेव्हा दुखीसुद्धा मनामुळेच झाले. माझ्या यशाचं श्रेय आईपासून ते माझा खूप लाड केलेल्या वडिलांना, माझ्या नवऱ्यापासून ते माझ्या मुलांना, माझ्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वच जणांना आहे. कारण माझ्या आयुष्यातल्या प्रत्तेक क्षणामध्ये कोणी न कोणी सामावलेलं होत आणि आहे. राहिली गोष्ट रागाची आणि लोभाची - तर मी जेव्हा खुश असायचे तेव्हा माझ्या आजूबाजूचे सर्व जन देवासारखे वाटायचे. पण जेव्हा मी दुखी असायचे तेव्हा सर्वांचा मला इतका राग यायचा कि एकेकाचा खून करुसा वाटायचा. पण या दोन्ही गोष्टी कायमस्वरूपी नाहीत. कायमस्वरूपी एकाच गोष्ट होती - मी माझ्या आयुष्यामध्ये अखंड समाधानी आहे. माझ समाधान कोण एका व्यक्तीवर अवलंबून नाहीये. किंवा कोणाच्या वागण्यामुळे माझ दुख नाहीये. जे काही तो फक्त एक मनाचा खेळ आहे. तो खेळ म्हणून हसत रडत खेळायचा कि युद्ध म्हणून जिंकण्यासाठी मरायचं-मारायचं ते आपणच ठरवायचं. खरच त्या काकुनी म्हंटल तर अगदी सामान्य आयुष्य जगलं आहे. पण अंमलबजावणी करायचं म्हंटल कि कळत. प्रत्तेकन स्वच्छंदी आयुष्य जगायला हव, कोणा एकावर आपला आनंद दुख विसंबून ठेवण्यापेक्षा आपल समाधान कशात आहे हे जाणून घ्यायला हव. बस मला एवढाच बोलायचं होत.'

अजून एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला, पण यावेळी त्या टाळ्यामध्ये एक विचाराची लाट जाणवली. त्यावेळी पहिल्यांदा त्याने तिला ऐकले होते, पहिले होते. त्याला एक क्षण असे वाटले कि - तिला हव असलेल आपण सर्व तिला द्यावं. पण परत त्यालाच लक्षात आलं. तिला हवं असलेल देणारे आपण कोण? ती स्वताच ते मिळवू शकते.