Monday, October 17, 2011

डाव मांडला

दोन्ही गुडघ्यांच्या भोवती हात बांधून भिंतीला टेकून बसली होती ती. ते जड दागिने, अंगावरचा तो शालू याची जणू तिला जाणीवच होत नव्हती अशी ती बसली होती. कालचा दिवस तिला लक्खपणे आठवत होता. तो साखरपुडा, तो अंगठी घालण्याचा कार्यक्रम, ती चेष्टामस्करी या सर्वांमध्ये तिला खूप मज्जा येत होती. काल ती खूप गोड दिसत होती. आणि खुशसुद्धा होती. पण मग आज हे रिकामं पण का आलाय तिला कळत नव्हत. तिच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न पिंगा घालत होते, अगदी त्या मंडपामध्ये पाऊल पडल्यापासून.
रात्रीचे ३ किंवा ३.३० वाजले असतील. उंबऱ्यावरच माप ओलांडून त्या घरात येवून तिला २-३ तास झाले असतील. घरात आल्यावर नाव घेणे, कुंकवाच्या पाण्यात अंगठी शोधणे असे कार्यक्रम झाल्यानानातर तिला व तिच्या पाठराखीनीला त्या रूम मध्ये आराम करण्यासाठी आणून सोडले होते. तिथे त्या दोघीच होत्या. पाठराखीण दिवसभराच्या लग्नातल्या धावपळीमुळे थकून झोपून गेली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे देव दर्शनालासुद्धा जायचं होत त्यामुळे सुद्धा तिची ती पाठराखीण झोपून गेली. हि मात्र तिच्या नव्या आयुष्याला निरखत बसली होती.  सर्व क्षण तिच्या डोळ्यासमोरून झरझर जावू लागले.
जेव्हा तिने साखरपुड्याच्या मंडपामध्ये पाऊल ठेवलं होत तेव्हापासून. त्या क्षणापासून तिच्या आई पप्पाकडे तिन नीट पाहिलं देखील नव्हत. तिचे वडील लांबूनच तिला बघून हरखून गेले. सारखी बडबड करणारी त्यांची खारू ताई आता दुसऱ्या झाडावर निघून जाणार होती कायमच.  तिचा इवला हात, इवले बोल. आणि आत्ताचा तिचा चिवचिवाट. त्याच एक पिल्लू उडून जाणार होत आणि त्या उडून जाण्याचा इतका मोठा सोहळा. त्यांना एकदम गलबलून आलं. ती मात्र एखादी हिरोईन असल्याचं अविर्भावात त्या मंडपात उतरली. दिसतही होती तशीच. सर्वांच्या मुखात एकच वाक्य - जोड कशी शोभून दिसतेय. तिने जाता जाताच ऐकल होत एक वाक्य - अगदी राधा कृष्णासारखे वाटत आहेत दोघे. तिला एकदम वाटल कि पण राध कृष्ण एकमेकांचे कुठे झाले होते. परत तिच्या दुसऱ्या मानाने तिला पटकन उत्तर दिले कि राधा कृष्ण एकमेकांचेच झाले होते. आणि खर तर कृष्ण राधेचा झाला होता. पण हे त्याचं एकमेकांच होण जगाला समजण्या पलीकडच आहे. कदाचित तिच्याहि  समजण्यापलीकडच होत ते. पण तिला वेळ कुठे होता तव्हा इतके विचार करायला. त्या साडीमध्ये ती झप झप चालत नवरीच्या रुममध्ये शिरली. तिथे थोडफार उरलेलं आवरलं. तशी पूर्ण तयार होवूनच आली होती. पण मुलींचं तयार होण अगदी शेवट पर्यंत असत, तिचंही काहीस तसंच होत. पण तिची धडपड म्हणजे हसल्यावर ओठांची लिपस्टिक दाताना नको लागायला यातच जास्त चालू होती. सवय कुठे होती म्याडम ला असल्या मेकअपची. मग थोडावेळाने अंगठी घालायचा कार्यक्रम. एकमेकांच्या हातामध्ये अंगठी घालताना तिच्या चेहऱ्यावर अगदी वेगळीच चमक आली होती. मग थोडे फोटो. मग पाया पडण. मग जेवण. झाल साखरपुड्याचा कार्यक्रम तर संपला. ती घरी गेली - तिच्या आई पप्पांसोबत. खूप खुश होती. इतकी थकून सुद्धा तिला अजिबात थकल्यासारखे वाटत नव्हते. तिला खूप मज्जा आली होती. रात्री झोपल्यावर तिची आई तिच्याजवळ बसून गेली थोडावेळ. तिच्या परीच्या अनावर तिने पांघरून घातलं. तिला अगदी लहानपणीची हट्टी परी आठवली. रात्री झोपताना कधी रागावली तर मुद्दामून पांघरून काढून झोपणारी. त्या आईच्या मनाला उगाच काळजी वाटली. त्या मिटलेल्या पापण्या तिला उदास वाटल्या. पण काही क्षणापुरतंच. जेव्या तिच्या लाडू बाईच्या हातावरची लाल चुटूक मेहंदी दिसली तेव्हा त्या आई च्या मानाने स्वताची समजूत घातली. 
दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तेच तिच्या मैत्रिणींच्या कलकलाटाने. तिच्या मैत्रिणी तिच्या त्या  घरट  सोडून  उडून जाण्याच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायला आल्या होत्या.  ती अजून खुश झाली. मैत्रिणीसोबत दंग घालून घेतला तिने - शेवटचा. तीच ते हसन खिदळण त्या वातावरणानेही सामावून घेतलं होत स्वतामध्ये. तिचे वडील लांबूनच तिचा खुश चेहरा पाहून निवांत झाले - रात्रीच्या कामामुळे त्यांना आलेली मरगळ एकदम निघून गेली सकाळी.  पार्लर मधून तयार होवून तिच्या मैत्रिणींसोबत ती मंडपामध्ये आली. पार्लर मधून त्या मंडपा पर्यंतचा रस्त्यामध्ये तिने तिच्या सर्व आयुष्याची उजळणीच जणू केली. 
सायकल न पडता शिकलेली सायकल, दुसर नंबर आला तरी बक्षीस न मिळाल्यामुळे आलेला राग, चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये आई ने भाग न घेवू दिल्यामुळे वाटलेलं दुख, सहलीला न पाठवल्यामुळे झालेली चिडचिड, आई पाप्पासोबत खेळलेले पत्ते, वर्गामध्ये सरांनी दिलेली शाबासकी, शिक्षकदिनाच्या दिवशी बनलेली हेडमास्तरीण, दहावीला मिळालेले मार्क, कॉम्प्यूटर बनवलेली पहिली फाईल, प्रोजेक्ट चं आलेलं टेन्शन, आणि त्याच प्रोजेक्ट च्या नावाखाली केलेली भटकंती. तिला काय वाटल कुणास ठावूक. तिने एकदमच कारमध्ये तिच्या वाहिनीला प्रश्न केला कि लोक का लग्न करतात? तिची वहिनी काय उत्तर देणार होती तिला. ती पुन्हा बोलली कि मला लग्न नाही करायचं मला पळून जायचं. 
तेवढ्यात कार मंडपाच्या दाराशी येवून थांबली. ती गप्प झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होत. शेजारीच तिची मैत्रीण बसली होती, तिच्याकडे तिने एक नजर पाहिलं. तिला वाटल किती सुखी आहे हि जोपर्यंत हीच लग्न होत नाही. मेकअप खराब होऊ नये म्हणून डोळ्यात आलेल्या त्या मोत्यांना परतवून लावलं तिन. वरात आली - नवरदेव आला. ती कार मधून उतरली आणि त्याच्यासोबत मंडपाकडे जावू लागली. तीच प्रत्येक पावूल तिला मागे खेचत होत. ताने तिच्या मनाला त्या कार मध्ये बसवून लांब कुठेतरी पाठवून दिल होत आणि आता फक्त तिचा देह मंडपाकडे चालला होता. मंडपाकडे चालत जाताना, मधेच तिला लक्षात आलं कि तिची आई बाजूच्या घोळक्या मधून तिच्याकडे पाहत आहे, तिला अगदी भरून आलं. ब्राम्हणाने घाई केली, आणि नवरा नवरी बोहोल्यावर चढले. त्यापुढचे तिला काहीच आठवेना. खूप प्रयत्न करूनदेखील तिला तिथून पुढे काय झाल, ते आठवेना. फक्त एकमेकांना हार घातल्याचा सीन आठवला तेवढंच. त्यानंतर सप्तपदी.  सात फेऱ्यांची सात वचन. त्याननंतर जेवण. एकमेकांना घास भरवायचा कार्यक्रम झाल्यावर तिने हळूच नवर्याला विचारलं - कि आता मी तुमच्या घरी येणार राहायला? नवरदेवाला तिची घालमेल कळली कि नाही कुणास ठावूक, पण त्याने कळल्याच दाखवलं तरी होत. कदाचित त्याच्याही मनामध्ये हीच घालमेल सुरु असेल कि आजपासून हि माझी सोबतीण होणार. 

तिला त्या एका प्रश्नाने ती आदल्या दिवशी खुश का होती याच उत्तर दिल. आदल्या दिवशी ती कार्यक्रम करून आपल्या आई पाप्पान्सोबातच जाणार होती म्हणून खुश होती. आज तसं नव्हतं. आज ती दुसर्यांच्या घरी जाणार होती. आणि तिथे तिला समजून घेईल कि नाही. स्वताला हव ते न मागण्याची सवय असलेल्या तिला तिथे कळून घेतील कि नाही याची तिला खूप भीती वाटत होती. कितीही चांगल असलं तरी शेवटी दुसराच घर असतं. तिला एकदम आठवलं तिच्या आई सोबत झालेलं तीच संभाषण. 
ती - आई तू आजीकडे (पप्पांच्या आई कडे ) इतकी का वेगळी वागतेस. म्हणजे तू किती घाबरतेस कि काही चूक होईल का म्हणून. आणि मामाकडे गेल्यावर मात्र अगदी निवांत असतेस. म्हणजे तू तीथापन काम करतेसच कि पण मामाकडे मात्र तू घाबरत नाहीस. 
आई - अगं किती जरी झाल तरी आजीच घर म्हणजे नवीन घर. सासर म्हणजे खूप जपून वागायचं. परक्याचच कि शेवटी. 
 ( कधीतरी तिची आई तिला म्हणायची कि कितीही झाल तरी मुलगी आपल्या आई पप्पाकडे पाहुणीच. )
ती - आई तू एका बाजूने म्हणतेस कि सासर परक आणि दुसऱ्या बाजूने माहेरी मुलगी पाहुनी असा म्हणतेस. मग मुलीचं खर घर कोणत? 
आई गप्प बसली. काहीच बोलली नाही. 

आत्ता तिला कळाल कि आई का गप्प होती. एक स्त्री हि फक्त स्वताच्या मनामध्ये स्वताच घर बनवू शकते. बाकी कुठेही जगाच्या पाठीवर तिला स्वताच हक्कच घर नसत. कधीतरी एका पुरुषाकडून आणि कधीतरी दुसऱ्या स्त्री कडून तिच्या स्वप्नांची कळत किवा नकळत पाडापाडी होत असते. कदाचित हे सर्वांच्या बाबतीत खरे नसेल सुद्धा. पण आईकडे पाहिल्यावर तिला नेहमी वाटायचे कि तिला बिचारीला कधी कुठे नीट सुख मिळाल आहे. 

तिच्या लेखी सुख म्हणजे मानसिक समाधान इतकंच होत. ती पुन्हा भानावर आली. पहाटेचे ४.४५ झाले होते. शरीर तिला झोप घे असं म्हणत होत. पण मन जागेवर कुठे होत. ती उठली रूम च्या बाहेर आली. तहान लागली नव्हती पण तरीही पाणी पिवून याव म्हणून उठली. रूम मधून बाहेर आल्यवर तिला पाहुण्यांच्या गर्दीमध्ये तिचा नवरा झोपलेला दिसला. तिला कळाल नाही कि कुठून स्वयंपाक घरामध्ये जाव. कारण सर्व जण झोपले असल्यामुळे जायला जागाच नव्हती तिला. ती तिथेच सर्वाकडे पाहत उभी राहिली, तिला खूप एकट वाटल. तिथे तिला स्वताच असं कुणीच दिसलं नाही आणि तिला रडूच कोसळलं. तेवढ्यामध्ये तिला रुखवतामध्ये तिने सोबत आणलेली तिची कृष्णाची मूर्ती तिला एका कोपऱ्यामध्ये दिसली. आणि तिला आठवलं कालच कानावर पडलेलं वाक्य 'राध-कृष्णासारखा दिसतोय जोडा'. पण राधा आणि कृष्ण एकमेकांचे कुठे झाले होते. ते खरे टर झाले होते आणि काल त्याच ते एकमेकांच होण न कळलेल्या तिला आज ते कळाल होत. तिला पळत जावून त्या कृष्णाला करकचून मिठी मारावीशी वाटली. 
तेवढ्यात सूर्य उगवला आणि ते लाल किरण त्या बसुरीवाल्याच्या चेहऱ्यावर पडले.  दूर कुठेतरी भूपाळीचे सूर भरून राहिले होते. तिच्या त्या नव्या आयुष्याची सुरुवात त्या बसुरीवाल्यासोबत झाली होती, तेही सूर्याच्या साक्षीने. 



Monday, October 10, 2011

चांदणं - १

कुकरची शिट्टी झाली आणि तिची तंद्री तुटली. फटाफट लसून सोलायला तिने सुरुवात केली. तेवढ्यात समोर खिडकीतून तिला एक ट्रक उभा दिसला, २-४ माणस त्यामधून समान उतरवून तिच्याच बिल्डींगमध्ये घेवून येताना दिसली. तिला लक्षात आला कि साने काकूंच्या घरी कोणीतरी नवीन किरायदार आला आहे ते. साने काकुनी तशी कल्पना तिला फोनवर दिली होतीच, पण इतक्या पटकन तिथे त्यांना नवीन भाडेकरू मिळेल असं वाटल देखील  नव्हत. पण असो, तिच्या किचनच्या खिडकीतून साने काकूंच्या किचन ची खिडकी आणि हॉल ची ग्यालरी दोन्ही नीट दिसत असल्याने तिला नवीन करमणूक मिळणार होती. मागचे भाडेकरू म्हणजे कोलेजच्या ३-४ मैत्रिणी होत्या. तिला त्या आधीच्या चार जणींचा पहिला दिवस आठवला.
नवीन होत्या शहरामध्ये आणि डॉक्टर चा कोर्स ला शिकत होत्या एवढंच तिला कळाल होत - तेही त्यांच्या गळ्यातल्या स्टेथोस्कोप मुळे. ती कधीच त्यांना बोलली नव्हती पण त्या जणू काही तिच्या जिवलग मैत्रिणीच होत्या. पहिल्या दिवशी त्या चारही जनी ग्यालारीमध्ये च दिवसभर गप्पा मारत बसल्या होत्या. त्यांची खरी नाव तिला माहिती नव्हती पण टोपण नाव तिला २ वर्षांच्या कालावधीमध्ये पाठ झाली होती - मणी, कुकी, शिल्पी आणि रोशा. त्यांची खरी भाषासुद्धा तिला कधी काढता आली नाही कारण कधी त्या हिंदीमध्ये बोलत कधी मराठीमध्ये कधी इंग्रजी मध्ये तर कधी भोजपुरी-बिहारीमध्ये. त्यांच्या ग्यालारीमध्ये त्यांनी दिवाळीला दिवे, तर ख्रिसमस ला बेल्स तर ईद ला लाइटिंग केलेली असायची म्हणून त्यांचा धर्मही तिला कधी समजला नाही पण जेवा त्या ग्यालारीमध्ये मस्त गप्पा टाकत उभ्या असायच्या ना तेव्हा तिला आपल्या किचनमध्ये मनोमन आनंद व्हायचा. तिला त्याचं स्वच्छंदी जीवन त्या किचनमधून पाहायला खूपच आवडायचं. हाकेच्या अंतरावर त्या चौघींच किचन आणि ग्यालरी असल्यामुळे ती जणू त्यांच्या प्रत्येक ख्सानामध्ये सोबत होती. 
"मम्मी मम्मी" करत विशाल आला आणि तिची तंद्री परत एकदा तुटली. विशाल ने हैप्पी मदर्स दे म्हणून तिच्या हातामध्ये एक फुल टिकवल. आणि एक गोड पापी गालात देवून निमूट उभा राहिला. 
ती - काय झाल, असं का उभा आहेस? काही हवाय का तुला?
विशाल - मला रिटर्न गिफ्ट कुठे दिलास तू!
ती विशाल च्या गालावर तिचे ओठ टेकवत म्हणाली - घ्या साहेब तुमच रिटर्न गिफ्ट, खुश आता.
विशाल - अग मम्मी तुला माहितीये, साने काकूंकडे नवीन ताई दादा आलेत. ताई ने आम्हा सर्वाना चोकलेट पण दिले. मी पण तिला लगेच आपल रिटर्न गिफ्ट देवून आलो.
ती - हो, मगाशी मी मोठी गाडी पहिली खिडकीतून पण पाहिलं नाही कोण होत ते. बर तू तुझा होमवर्क केलास का?
विशाल - हो केला.
ती - कधी केलास ? शाळेतून आल्यापासून तर बाहेरच आहेस.
विशाल - म्हणजे नाही केला, तू मला पूर्ण वाक्यच बोलू देत नाहीस. मला भूक लागलीये आधी जेवायला दे आणि मग अभ्यास.
ती - ठीकेय. जेवण झाल्यावर आपण दोघेपण अभ्यासाला बसुयात.

एव्हाना तिचा स्वयंपाक पूर्ण बनवून झाला होता. जेवण करून आवरून ती किचन साफ करत होती, सहज बघावं विशाल चे नवीन कोण ताई-दादा आहेत असं विचार मनात आला म्हणून तिने किचनची खिडकी उघडली. तर त्यांच्या किचनची लाईट सुरूच होती. ती थोडावेळ पाहत राहिली कि कोणी दिसेल म्हणून पण दिसलं नाही. ती खिडकी लावणार एवढ्यात तिने आवाज ऐकला, मना म्याडम कॉफी तयार आहे. आणि तो दिसला. काळा शर्ट, केस विस्कटलेले तरीही मधून भांग आहे हे स्पष्टपणे दिसत होत, हातामध्ये २ कॉफीचे मग घेवून निघाला. तेवढ्यात तिचे लक्ष ग्यालारीकडे गेले. तिथे ती दिसली. गुलाबी पंजाबी ड्रेस मध्ये केस मोकळे, रात्र झाल्यामुळे चेहरा नीट दिसत नव्हता पण तिच्या आकृतीकडे पाहूनच तिचे मन प्रसन्न झाले. तेवढ्यात तो ग्यालरी मध्ये अवतरला. 
तो - "घ्या  म्याडम तुमचा चंद्र ढगांच्या पलीकडे जायच्या आधी तुमची कॉफी तयार आहे." 
ती - "जया थांकू थांकू. आम्ही आपले आभारी आहोत. "

तिला त्या दोघांची ओळख झाली अगदी पहिल्या दिवशीच. त्यांच्या त्या घरातल्या पहिल्या दिवशी. तो जया आणि ती मना. तिला कळाल नवीन जोडप आलंय राहायला ते, आणि कदाचित हि त्यांची लाडाची नाव असतील. ती विचार करू लागली - कदाचित त्याच नाव जय असेल. किंवा जयेश, जयपाल, जयकुमार किंवा अजून असंच काहीतरी. आणि तीच मोनाली, मनिका, मंदाकिनी. नाही नाही मंदाकिनी नसेल. मंजुश्री, असू शकेल किवा अजून दुसरच काहीतरी असेल. 
ती विचारच करत होती तेवढ्यात मना ओरडली - " ए आला आला, परत चंद्र बाहेर आला ढगांमधून "
जया - "मना माझी शर्त तर मी पूर्ण केली, तुझा चंद्र ढगामध्ये जायच्या आधी कॉफी बनवली आता तुलासुद्धा तुझी शर्त पूर्ण करावी लागेल. जा जावून कचरा टाकून ये."
मना विचित्र तोंड करत करत निघून गेली आणि तो ढगामधल्या चंद्राकडे पाहण्यात मग्न झाला. कॉफीच्या वाफा हवेमध्ये विरून गेल्या होत्या.

तिने खिडकी लावून घेतली, शेवटच फडक मारलं किचनमध्ये आणि झोपायला गेली. आज तिची रात्र खूप सुंदर होणार होती - तिच्या स्वप्नात चंद्र येणार होता. तिने लाईट बंद केला, अंधारामध्ये स्वताला एक मंद स्मित दिलं आणि पापण्या मिटल्या.