Friday, August 10, 2012

डायरीच पान


(सन १९०२, वय १४ वर्षे,  पान नं. ७६ )
शेजारच्या काकू सांगतात कि मी इथे ७ वर्षाची असताना लग्न करून आले, तेव्हा खूपच खोडकर आणि सारखी खेळायला पळणारी होते, पण आता मी खूपच शांत झालीये. मला नाही वाटत कि मी शांत झालीये. अजूनपण मी मंगळागौरीला, पंचमीला खूप खेळते. खूप मज्जा येते पंचमीला आई कडे जायला. आज मी शंकरपाळे बनवले, आत्याबाईना आवडले आणि मला मस्त वाटलं. उद्या करंजी शिकणारे मी त्यांच्याकडून. ह्यानापण खूप आवडते करंजी. मोठ्या वाहिनी आणि मी यावर्षी पंढरपूरला जाणारेत. खूप मज्जा येईल. हे आले तर अजूनच मज्जा येईल. काल ह्यांना मी जेवायला वाढले तेव्हा त्यांच्याकडे पाहता पाहता मी आमटी ताटामधेच वाढली. मामंजींनी एकदम रागानेच पाहिलं माझ्याकडे. पण मज्जा आली यांच्याकडे पाहताना. उद्या सकाळी आत्याबाई नी द्यायच्या आधी मीच यांना चहा नेवून देणारे. चला आता झोपते पटकन.

(सन १९४२, वय १९ वर्षे, पान नं. १४९ )
आई आणि अण्णा खूपच काळजीत आहेत, लग्नच जमत नाहीये म्हणून. आई तर म्हणते आता कोणी विधुर किंवा मोठ्या वयाचा असेल तरी चालेल, पोरीला उजवून टाकली पाहिजे. पण मला काही चिंता नाहीये. शेजारच्या टेंभी सारखा फुकटा नवरा करून घेण्यापेक्षा असाच राहील तरी चालेल. म्हणजे मला चालेल, आई  अण्णांना नाही चालणार.
पण मला तर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी लढनाराच नवरा हवा, आई अण्णांना कस सांगू हे. एकदम तगडा, सतत कुठल्या ना कुठल्या चळवळीत मग्न असणारा, मी त्याच्या साथीने भाग घेईन या लढाई मध्ये. मला तर कधी एकदा त्या मोर्च्यामध्ये जाते असं होतंय. त्या पलीकडच्या आळीतल्या बायका नाही का जात त्यांच्या घराच्या पुरुष मंडळींसोबत. आमचे अण्णा म्हणजे मुळचेच घाबरट आहेत. मी एकदा हिम्मत करून विचारलं तर तेव्हापासून आई ने लग्नाचा चंगच बांधलाय. आता नक्कीच आत्त्याच्या मुलाशी, ज्याची एक बायको आधीच स्वर्गवासी झालीये, त्याच्याशी लग्न लावून देतील. एवढ वय झालाय म्हणून मला बाहेरही पडायची भीती.  अरे बापरे, अण्णा आले वाटत. चला झोपते नाहीतर काय लिहिते ते येवून बघतील.

(सन १९६२, वय १२ वर्षे, पान नं. ४३)
आज शकुच्या हळदीचा कार्यक्रम होता. किती छान दिसत होती ती. मीसुद्धा हट्ट धरला आई जवळ कि मलापण लग्न करायचं. तर भाऊ हसायलाच लागले, मला म्हणाले, "सुमे, तुला रमाबाई सारख डॉक्टर व्हायचं. इतक्यात लग्न नाही. अजून उशीर आहे. " पण गाव सोडून इकडे आल्यानंतर फक्त शकूच ती काय माझी मैत्रीण होती. आता तीपण लग्न करून जाणार म्हणजे मी एकटीच पडणार. गावी कित्ती कित्ती मज्जा यायची. इथे या शहरात तसे काहीच नाही. 
आणि आई काय म्हणाली माहितीये, "सुमन तुला लग्न म्हणजे काय ते तरी कळत का? आणि तू लहान आहेस अजून." ती कधी शाळेत नाही गेली, मग माझ्या का मागे लागते शाळेत जा म्हणून. आणि तिला काय माहिती, मला माहितीये लग्न म्हणजे काय ते. गावी असताना भाऊ कसे आई साठी शेतातून येताना गुपचूप मोरपीस घेवून यायचे. मेहंदीच्या झाडाची पान घेवून यायचे, आईला मेहंदी खूप आवडते म्हणून. मग आई ती पान वाटून कुटून त्याची नागमोडी नक्षी तिच्या आणि आम्हा सर्वांच्या हातावर रंगवत असे पंचमीला. आई आणि भाऊ, दर वर्षी गावाच्या जत्रेत दोघंच मिळून जायचे. आम्हा पोरांना घरीच ठेवून. आणि आई सुद्धा आज्जीने कितीही रागवल तरी जायची. खंडोबाला जेव्हा भाऊ जायचे तेव्हा आई एकदा खूप आजारी होती तरीसुद्धा तेव्हा तिने फराळ बनवून दिला होता भाऊ सोबत. मग असं आई आणि भाऊ सारख राहाण, फिरणं, सोबत करणं, एकमेकांच्या आवडी निवडी जपण म्हणजेच लग्न ना. आता शकीला पण तिचा नवरा गुपचूप बाहेरून वडापाव आणून देईल. आणि तीच आणि माझ वय तर सारखंच आहे. तरी म्हणे कि मी लहान आहे. नाही मला लग्न करायचंच आहे.

(सन १९८२, वय २०, पान नं. ३११)
आज तो दिसला नाही कोलेज मध्ये. मन लगेच अस्वस्थ होत, तो नाही दिसला तर. कुठेतरी कादंबरीमध्ये हे असं झाल कि याला प्रेम म्हणतात, असं वाचलंय. पण छे, मला नाही वाटत. कदाचित मला सवय लागलीये त्याला रोज पहायची, दिसला नाहीतर शोधायची. एकदा तो दिसला कि कस शांत शांत वाटत. कधीतरी वाटत कि त्याने येवून बोलाव, मी त्याला माझ्या नोट्स द्याव्यात. सोबत अभ्यास करावा. त्याच्यासोबत केला तर किती अभ्यास होईल नाही माझा, उगाच लायब्ररी मध्ये त्याला शोधायचा वेळ तरी वाचेल. खरच यालाच प्रेम म्हणतात का? पण काय उपयोग ! जर हे प्रेम असेल तर त्यालापण माझ्याबद्दल असं काहीतरी वाटलं पाहिजे तर मज्जा आहे. नाहीतर एकाच बाजूने काही उपयोग नाही. अरे मी विसरलेच, कि मला कळणार कस कि त्याला पण मी आवडते का ते. मी त्याच्याशी असं काही जावून विचारू शकत नाही. आणि जरी काही त्याला वाटत असलं तरी आमचे पिताश्री, आजोबा, काका, आत्या, मातोश्री या सर्व मिळून मला आणि त्याला सुळावरच चढवतील. बरंय, हे असाच छान आहे. त्याला रोज रोज शोधण. यातपण मज्जा येते. 


(सन २००१, वय २४, पान नं. ६३४)
आता घरी लग्नाचे विषय सुरु झालेत. डिग्री झालीये, जॉब शोधत आहे. पण घरी अजून अनुजबद्दल बोलले नाही. एकदा त्याला जॉब मिळू देत मग बोलेन. असे दिवस उडून गेले ते कळलहि नाही. आत्ता परवा तर अनुजची आणि माझी भेट झाली होती. 
मला असं वाटायचं कि, हात हातात पकडून कधीच न सोडून जाणारा जीवन साथी हवा. अखंड सोबत करणारा. जो फक्त असं नाही म्हणणार, "हे बघ, हा रस्ता आहे यावरून तुला चालायचं आहे." पण तो अखंडपणे त्या रस्त्यावर माझ्यासोबत चालत राहील. मी कुठे अडखळले तर मला सावरून घेईल. त्याच्या आणि माझ्या वाटा एक आहेत असं कोणीतरी पाहिजे होत मला. हवेवर माझे केस उडताना माझा चेहरा झाकून टाकतील, मी पुन पुनः केसांच्या बटा कानाच्या मागे करेन आणि तरीही वारा हट्टाने परत केसांची उलथापालथ करेल. आणि असं वाऱ्याशी झगडताना त्याने माझ्याकडे एकटक पाहत राहावं. मी दिलेल्या पत्राचे दिवसातून चार वेळा पठण करणारा, मला रोज पाहिल्याशिवाय त्याचा दिवस सुरूच झाला नाही असं मानणारा.  मी जेव्हा त्याच्यासाठी कर्वा चौथ च व्रत पकडेन तेव्हा ऑफिस वरून धवत पळत माझ्यासाठी घरी लवकर येणारा. मी रुसले, आणि जेवले नाही तर तोही न जेवणारा. एकमेकांकडे तासनतास पाहण्यात किती मज्जा येते नाही.
त्या सर्व गोष्टी माझ्यासोबत उत्साहाने करणारा ज्या मला करायच्या होत्या पण मी आजपर्यंत केल्या नाहीत- कारण माझी आई म्हणायची कि जे करायचं ते नवऱ्याच्या घरी जावून करायचं, म्हणून मी इतकी वाट पाहिलेली त्या सर्व गोष्टी करण्याची.
माझ्यासोबत मस्ती घालणारा. आयुष्य एक जगायची गोष्ट समजणारा, ना कि रेटायची. 
जो त्याची प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करणारा. त्याच्या सुखाचा आणि दुखाचा खरोखर भागीदार मला म्हणणारा. 
असं कोणीतरी, कि ज्याच्यासोबत मलाही रहावस वाटावं. असं कोणीतरी हव होत कि ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा. त्याने प्राण जरी मागितला तरी मी तयार होईल, असा कोणीतरी. ज्याच्यासाठी मला माझ सर्वस्व विसरून त्याच्यात विलीन होण्यात दुख किंवा परोपकार वाटू नये, तर आनंद व्हावा असा. ज्याची स्वप्न पूर्ण करण्यात मला हातभार लावायचा होता, आणि त्याची स्वप्न पूर्ण होताना मला त्याला हसताना पाहायचं होत, असा कोणीतरी. 
रात्री १ वाजता मला बाहेर बाईक वर फिरायला घेवून जाणारा, थोडक्यात आयुष्य फुल्टू जगणारा. आयुष्यातले छोटे छोटे आनंद जगण्यासाठी सदैव तयार असणारा, ना कि विकेंड ला घरी घोरत पडणारा. मला त्याची जिवाभावाची मैत्रीण बनवणारा. असा कोणीतरी.

आणि तो अनुज भेटला. अगदी तसाच, किंवा याच्या दोन पावलं पुढेच. 
घरून लग्नाला विरोध होणार हे माहितीये मला. पण मी तयार आहे. सगळ्यांना पटवून दाखवेन कि अनुजच तो आहे ज्यासोबत मी लग्न केल पाहिजे. आई - पप्पांना पण पटेल हे आणि ते नाकी हसत हसत मला परवानगी देतील.

(सन २०१२, वय २७ वर्षे, पान नं. ३४)
आज परत ब्रेक अप झाल. last time प्रतोत सोबत, त्या आधी विजय. आणि आता राहुल सोबत पण. साले सर्वाना फक्त कीस पाहिजे असत. पण, यांच्यापैकी कोणी तरी त्या लायकीच तरी होत का. Now enough is enough . इथून पुढे मी डेटिंग करणारच नाही. आणि आरे लग्न करायचं आहे मला, ते काही फक्त शरीर सुखासाठी नाही. ते तर माझ्या boyfriend कडून पण मला मिळू शकलं असत. मला नवरा हवाय. जो आयुष्यभराचा वादा करेल. ज्याच्यासोबत मला माझ यश-अपयश सुखानं वाटायचं आहे. मी bold आहे, याचा अर्थ असा नव्हे कि माझ्यासोबत काहीही चालत. मी पण एक मुलगीच आहे. मलाही कुठेतरी जावून स्थिर वायचं आहे. I agree , कि मी काही perfect नाहीये. आणि मला Mr Perfect नकोय पण. पण जो माझ्यावर मनापासून प्रेम करेल, आणि मीसुद्धा ज्याच्यावर. खूप प्रेम करेल असा मुलगा हवाय. मिळेल का मला असा मुलगा ? 

विजय ने मला डिच केल ना तेव्हाच मी ठरवलं होत कि आता no boyfriends . पण मग मम्मा मागे लागली, आता लग्न कर म्हणून. मग तो प्रतोत. तो मॉम च्या मैत्रिणीचा मुलगा. तोही तसलाच. and Rahul was height of all this bloody shit . मला आता लग्नच करायचं नाही. 
खरच मम्माचा time किती चांगला होता, atleast विश्वास तरी ठेवण्यासारखी लोक होती तेव्हा. पण आता. no hopes at all ...

-----------------------------------

(सन २०१२, वय ७३ वर्षे, डायरी नं. ४ किंवा ५, पान नं. २१०)

खरच आयुष्याची उजळणी करताना आता जाणवतंय कि सुखाचे क्षण कोणते असतात ते. आपल्या जोडीदाराचा शोध हा कोणताही मोठा जॉब मिळवण्यापेक्षा आणि कॅरिअर पेक्षा किती महत्वाचा असतो ते समजतंय.
लग्नानंतर दोन वेग-वेगळे जीवन जगणारी लोक एकत्र येतात कशी, आणि एकमेकांचे होवून जातात कशी हे जेव्हा या अशा उतार वयात समजत नाही तेव्हा त्या लग्नांना यशस्वी लग्न म्हणता येईल. आणि आत्ताच प्रेम म्हणजे काय हे उमगेल. आत्ता लक्षात राहतात ते फक्त पहिल्या वहिल्या हातात हात घेतल्याचे स्पर्श. पहिल्यांदा ओठांनी ओठांशी केलेल्या सलगीचे स्पर्श कुठे स्मरणात पण राहत नाहीत. 
थोडक्यात शरीराची गरज एका वयापुरती असते. पण मनाच्या सोबतीची गरज हि निरंतर असते. त्या उपभोगाचा मागमूसही आता आपल्या गावी नसतो. आठवतो तो फक्त प्रेमाचा स्पर्श - कधी आठवतो तो नवीन लग्न झाल्यानंतर नवऱ्याचे आपले फोटो काढण्याचे वेड, तर कधी त्या मंडपातून आई वडिलांना सोडताना वाहत असलेल्या अश्रुना पुसलेला हात, कधी गर्दीमध्ये चुकामुक होऊ नये म्हणून एकमेकांचा घटत पकडलेला हात. बसमध्ये तिच्या खांद्यावर ठेवलेलं डोक आणि त्या निवांत झोपेचा क्षण. कधीतरी स्वताच्याशी नकळत जोडीदाराच्या आवडीच्या केलेल्या गोष्टी. ती समुद्र किनारी चंद्राला पाहत गप्पा मारत घालवलेली रात्र. 

खरच, आज मला यांच्या अशाच कितीतरी गोष्टी आठवत राहिल्या, ज्या कदाचित मी इथे या डायरीच्या पानावर शब्दामध्ये मांडू शकणार नाही. आणि खरच मी खूप आभारी असेल त्या देवाची, त्या विधात्याची ज्याने माझ्या आयुष्यामध्ये असे क्षण लिहून ठेवले. आणि माझ्या या जोडीदाराची ज्याने माझी अखंड सोबत केली, आणि अजून करत आहे. मी खूप सुखी आहे. 
आज खूपच छान वाटत होत. आणि जेव्हा त्यांनी नोकराकडून चहा मागवला, तेव्हा अगदीच क्वचित व्हीलचेअर वरून काम करणाऱ्या माझ्या शरीराने ठरवलं कि 'आज अपने यार के लिये एक अद्रक वाली चाय तो बनती है - उसके प्यार के लिये एक बडिया चाय उसके पसंद वाली.'     


2 comments:

  1. apratim, tumhi pratikriya dilit mzya blogwar... pan kharach tumacha blog khup sunder डायरीच पान tar apratim...

    ReplyDelete
    Replies
    1. khar tar itka kahi khas nahiye, tumhala awadal mhanun tumhala khup chan watala...pan purn blog war mala samadhankarak ekach post ahe - कृष्ण उवाच.
      ani tumachya kautukabaddal kharach manapasun dhanyawaad. karan kuthuntari inspiration milat asta mhanun ajun lihil jaat.. :)

      Delete