व. पु. काळेंच 'महोत्सव' वाचत पडले होते. व. पु. म्हणजे एक समीकरण आहे, जे सोडवत असताना कळत जात कि मूळ प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे. नात्यांचे रंग अगदी सुंदर पद्धतीने रंगवणारे म्हणजे व.पु हि व्याख्या माझ्यासाठी. तेवढ्यात बऱ्याच दिवसांनी एका मैत्रिणीचा -अंजलीचा फोन आला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या नंतर तिने सांगितले कि आजच ती समृद्धीला भेटली होति. साहजिकच मी विचारले समृद्धी बद्दल कि काय करते, कशी आहे ती. फार दिवसात काय पण वर्षात समृद्धी चे आणि माझे बोलणे नव्हते, अर्थात ती माझी तेवढी जवळची नव्हतीही कि मी मुद्दामून कधी तिला बोलायला गेले नाही .
अंजू सांगू लागली कि अग समृद्धी तर खूप मजेत आहे. नुकताच लग्न ठरलं आहे तीच आणि आता साखरपुडा होणारे. त्याची खरेदीच करायला आली होती ज्वेलर्स च्या दुकानात. मी गणपतीसाठी चांदीचा पूजा सेट घेण्यासाठी गेले होते, आणि तिथे समु दिसली. हिऱ्याचे दागिने घेत होती ती साखरपुड्यासाठी आणि तेसुद्धा स्वताच्या कमाई ने . एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करते आहे ति. पुढच्या महिन्यात कंपनी तर्फे जर्मनी ला जात आहे .
अजून चार दोन गोष्टी बोलून अंजू ने फोन ठेवला. मी परत व.पु मध्ये गुंतले. पण काहीतरी गडबड झाली होति. व.पुंच्याच भाषेत सांगायचं तर मी कथा वाचत होते, शब्द डोळ्यासमोर होते पण रजिस्टर होत नव्हते. एकदम अस्वस्थता आली होती मनामध्ये . आणि असे का हे कळत नव्हते. मग थोडा विचार केल्यावर मनाची उजळणी केल्यावर लक्षात आले कि माझ्या मनाची हि स्थिती अंजूचा फोन ठेवल्यापासून झाली आहे . आणि मनाला मान्य होत नव्हते पण या अस्वस्थतेचे कारण समृद्धी होती . आता या सर्वात समृद्धी चा काय संबंध आहे . तिची आणि माझी तेवढी मैत्री पण नव्हती . मग ?
त्यासाठी आपल्याला थोडस मागे जाव लागेल . मागे म्हणजे माझ्या कॉलेज च्या दिवसात.
कॉलेज मध्ये असताना समृद्धी, अंजू, मी , पूर्वा, कादंबरी असा सर्व जणींचा ग्रुप होता . आमच्या मध्ये मी सर्वात जास्त अभ्यास, करिअर यांना महत्व देणारी होते . म्हणजे बाकीच्या नव्हत्या असे नाही . पण माझी इच्छा थोडी जास्तच होती आणि प्रबळ ही. मी घरातील लग्न किंवा इतर समारंभा मध्ये कमी आणि कॉलेज च्या activities मध्ये जास्त असायचे . पण माझे आई वडील त्या वेळी जुन्या विचारांचे होते. मला इंजिनिअर ची डिग्री मिळाली कि लगेच २ महिन्यात लग्न उरकायच असाच त्यांचा बेत होता . पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. एकतर एकुलती एक असल्याने मला असा वाटायचं कि मीच आई वडिलांचा मुलगा बनून मुलगा जी सुख देतो आई वडिलांना ती द्यायची. आणि ते सुख त्यांना देण्यात मला अपार सुख मिळणार होते. समृद्धी च्या घरी वातावरण आधीपासून च खूप आधुनिक होते. पण तिची अभ्यासात तेवढी प्रगती आणि इच्छा अशी काही नव्हती . खरतर इंजिनिअर ला एडमिशन मिळाले म्हणून ती ते शिकत होती. मला स्वावलंबी बनून माझ्या स्वताच्या बळावर आयुष्यामध्ये सर्व काही मिळवायचं होत . आणि माझ्या उलट समृद्धी. ती तर विचार करायची कि श्रीमत घरी लग्न करून आयुष्य एकदम आरामात घालवायच. झालाच तर पुढे एम. बी . ए . शिकायचं . अशा आम्ही दोन टोकांच्या होतो . पण आज समृद्धी माझ्या भूमिकेत आणि मला तिच्या भूमिकेत स्वताला पाहताना तिचा हेवा वाटला.
आणि म्हणून मी खूप अस्वस्थ झाले होते. माझ्या आई वडिलांनी त्यांनी ठरवल्याप्रमाणे माझ लग्न लवकर उरकून टाकल. लग्न झाल आणि माझ करिअर, करिअर करण्याची जिद्द सर्व काही वसंतातल्या पानगळी प्रमाणे गळून पडल . सासरी सर्व सुख असूनही मी मात्र सर्वापासून वंचितच राहिले. कारण माझ अस अस्तित्व नव्हतच तिथे. ती निर्माण करायची जिद्द सुद्धा अंगात नव्हती याबद्दल अजून जास्त वाईट वाटायचं. एकटी असले कि असे विचार नेहमीच मनात रुंजी घालत. आणि आज मी जी काही जीवापाड स्वप्न पहिली होती ती समृद्धी ला जगताना पाहून मला हेवाच वाटला तिचा. एक अर्थाने कुठे तरी मनात समाधान हि होत कि मी नाही करू शकले तरी ती तरी करू शकली ना. दुसऱ्या क्षणी स्वताची चीड येत होती हे सर्व मी का करू शकले नाही. त्याच्या पुढच्या क्षणाला वाटल कि आपल नशिबच अस आहे त्याला काय करणार. पण मग वाटल कि आपण तर नशीब घडवण्यावर जास्ती विश्वास ठेवायचो मग आता का दुर्बल विचार मनामध्ये. मग वाटल कि आपल्या असहायतेला आपण नशीब म्हणत आहोत. मग वाटल कि छानच झालाय आयुष्य आत्ताही . माझा नवरा, सासरची मंडळी सर्व इतकी चांगली भेटली हे चांगलच झाल ना आयुष्यामध्ये. पण जी स्वप्न जीवापाड जपली ती प्रत्यक्षात न येत स्वप्नातच राहिली . त्यातला एखाद तरी स्वप्न खर ठराव, माझ आयुष्य सार्थकी लागल्यासारख वाटेल. शेवटी वाटल कि या प्रसंगाने माझ्या मनात कॉकटेल निर्माण केलंय . राग , प्रेम , आनंद , दुख, सुख , समाधान, असूया, हेवा , मोह , तिरस्कार, असहायता सर्वच हवन एकदमच गोंधळ घालत आहेत मनात.
शेवटी आयुष्यात काय केलय यापेक्षा कोणत्या भावनेने केल आहे तेच जास्ती महत्वाचे, सर्वाना आनंदाने दिलेल्या गोष्टी सरतेशेवटी आपल्याला आनंदच देवून जातात. हाती आहे ते सोडून पळत्यामागे धावले कि तेल सांडून जाते आणि तूपही लवंडून जाते.